
मालवण : गेले तीन दिवस सुरु असलेल्या आचरा गावच्या गावपळणीत गाव पुन्हा भरण्यासाठी आज दुपारी श्री देव रामेश्वराला कौल लावला असता श्री देव रामेश्वराने आज गाव न भरण्याच्या बाजूने कौल दिल्याने या गावपळणीचा मुक्काम आणखी एक दिवस वाढला आहे. यामुळे आचरे वासियांना आजचा आणखी एक दिवस व रात्र वेशीबाहेर मुक्काम करावा लागणार असून उद्या १९ डिसेंबर रोजी आचरा गाव पुन्हा भरणार आहे.
मालवण तालुक्यातील आचरा गावच्या ऐतिहासिक गावपळण प्रथेस रविवार दि. १५ डिसेंबर रोजी सुरुवात झाली. गावपळणी साठी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराने आदेश दिल्यानंतर ग्रामस्थानी घरे दारे बंद करत गाव सोडून वेशीबाहेर आपला संसार थाटला. गेले तीन दिवस व तीन रात्री ग्रामस्थ वेशीबाहेर उभारलेल्या राहुट्यांमध्ये निसर्गाच्या सानिध्यात मौज मजा करत जीवनाचा आनंद लुटत आहेत. गावपळणीचे तीन दिवस पूर्ण झाल्याने गाव पुन्हा भरण्यासाठी आज दुपारी श्री देव रामेश्वराला मानकरी व ग्रामस्थ यांनी कौल लावला. यावेळी रामेश्वराने आज गाव न भरण्याचा कौल दिल्याने गावपळणीचा एक दिवस वाढला आहे. गावात येण्याचा कौल न मिळाल्याने ग्रामस्थाना वेशीबाहेर आणखी एक दिवस मुक्काम करावा लागणार असून उद्या ग्रामस्थ पुन्हा श्री देव रामेश्वराला सांगणे करून आचरे गावात परतणार आहेत. गावपळणीचा एक दिवस वाढल्याने ग्रामस्थांना आणखी एक दिवस गावपळणीचा आनंद लुटता येणार आहे.