
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आवारात 30 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बाउन्सर आणि कार्यकर्ते यांच्यातील हाणामारी प्रकरणात सर्व 8 आरोपींची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपींचे वकील अँड. परिमल नाईक आणि अँड. सुनील लोट यांनी बाजू मांडली.
जिल्हा परिषद आवारात माजी आमदार वैभव नाईक आणि उबाठाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील उपोषण आटोपल्यावर उपस्थित असलेले बाउंसर व कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या हाणामारी नंतर दंगल घडवून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून पोलिसांनी ऑल्वीन कुस्तान पिंटो, क्रिस्टोफर जेम्स क्रिस्टोफर, फयाज हसन अली मुजावर, कृपेश केशव राठोड, प्रथमेश मोहनराव सावंत, दत्तम सुरेश लोके,लक्ष्मण कृष्णा हन्नीकोड, आणि अरूण हरी परब यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 194 (1) आणि 194 (2) नुसार दंगल घडवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप लावला होता. या खटल्यात सरकारी पक्षाने एकूण 6 साक्षीदार तपासले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी उलटतपासणीमध्ये साक्षीदारांच्या जबाबात अनेक विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याशिवाय, एफआयआर दाखल होण्यास झालेला विलंब आणि घटनास्थळी उपस्थित असूनही इतर साक्षीदारांना न तपासल्याचा मुद्दाही त्यांनी न्यायालयासमोर मांडला.
न्यायालयाने आरोपींच्या वकिलांनी मांडलेले हे मुद्दे ग्राह्य धरले. तसेच गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक पुराव्यांचा अभाव असल्याचेही नमूद केले. या सर्वबाबी लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व 8 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला.
हे प्रकरण त्यावेळी निविदा विषयावरून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते.