
कणकवली : मामाला लग्नाची पत्रिका देऊन पोखरणहून फोंडाघाटकडे भरधाव वेगाने दुचाकीवरून भाऊ व बहीण जात असताना तळवडे-आंब्रड मार्गावर तळवडे-बौद्धवाडी येथे तीव्र उतारावर कणकवलीहून आब्रडच्या दिशेने जाणाºया एसटीला साईट देण्याच्या नादात दुचाकी स्लीप झाल्याने दोघेही रस्त्यावर पडले. या अपघातात दोघे गंभीररित्या जखमी झाले. निकिता दिलीप सावंत (२८, रा. फोंडाघाट-गांगोवाडी) हिचा उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैभव दिलीप सावंत (३२ रा. फोंडाघाट-गांगोवाडी) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास तळवडे-बौद्धवाडी येथील रस्त्यावरील तीव्र उतारावर घडला. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वैभव सावंत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवलीहून आंब्रडच्या दिशेने जाणारी एसटी बस जात असताना तळवडे-बौद्धवाडी दरम्यान रस्त्यावरील तीव्र उतारावर समोरून भरधाव येणाºया दुचाकीस्वाराची एसटीला साईट देण्याच्या नादात दुचाकी स्लीप झाल्याने स्वार वैभव सावंत व त्याच्या मागे बसलेली बहीण निकिता एसटीच्या मागील चाकाखाली पडली. त्यावेळी एसटी चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. मात्र, तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन एसटीचे चाक तिच्या कमरेला घासले गेले. दुचाकीस्वार रस्त्यालगत पडल्याने तोही जखमी झाला. एसटी चालकाने बसमधून अपघातग्रस्तांना आंब्रड येथील प्राथमिक आरोग्य दाखल केले. याठिकाणी दोघांवर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कणकवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, निकिताची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. वैभव याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत एसटी चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर (४६, रा. जळकेवाडी, कणकवली) यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातप्रकरणी वैभव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे करीत आहेत.