
कणकवली : मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी गोवा ते कणकवली-कलमठ येथे येणाऱ्या विवाहितेवर काळाने घाला घातला. मोटरसायकलने पती आणि मुलासह येणाऱ्या उत्कर्षा उत्तम गोसावी (वय ३४) हिचे अपघातात निधन झाले. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील पिंगुळी येथे आज दुपारी २.३० च्या सुमारास घडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकीसाठी मतदार यादीमध्ये नाव असलेली आणि बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांना बोलावून घेतले जाते. त्याप्रमाणे गोवा-पेडणे येथे राहणाऱ्या उत्कर्षा उत्तम गोसावी हिचे मतदान कणकवली-कलमठ ग्रामपंचायतमध्ये असल्यामुळे तिला सुद्धा मतदानासाठी बोलविण्यात आले होते. आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी ती पती उत्तम विठ्ठल गोसावी यांच्या ताब्यातील मोटरसायकल नंबर (जीए ११ सी ६५१२) यांच्यावरून गोवा ते कणकवली असे येत होते. त्यांच्या समवेत उत्कर्षा गोसावी आणि मुलगा युवन्स गोसावी (वय १ वर्ष) हा होता मोटरसायकल महामार्गावरील पिंगुळी येथे आल्यावर उत्तम गोसावी यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटून महामार्गाच्या साईडपट्टीवरून मोटरसायकल शेतात गेली. यामध्ये उत्कर्षा गोसावी हिच्या डोकीला मार लागल्याने तिचे निधन झाले. उत्तम गोसावी आणि युवन्स गोसावी यांना किरकोळ जखम झाली. ही घटना समजतात कणकवली येथील नातेवाईक कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झाले. उत्तम गोसावी आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा युवन्स कुडाळ ग्रामीण येथे उपचार घेत आहे.