तिलारी घाटात मालवाहू ट्रकला अपघात

Edited by: लवू परब
Published on: May 16, 2026 11:22 AM
views 63  views

दोडामार्ग : तिलारी घाटात एका मालवाहू ट्रकला अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने संरक्षक कठड्याला धडकल्याने ट्रक खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. मात्र संपूर्ण रस्ता व्यापल्याने याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. एक ट्रक शनिवारी सकाळच्या सुमारास तिलारी घाट उतरत होता. घाटातील तीव्र उतारावरील धोकादायक वळणाचा अंदाज चालकास न आल्याने ट्रक थेट रस्त्यालगतच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळविल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली आणि ट्रक खोल दरीत कोसळण्यापासून बचावला.

अपघातानंतर ट्रक आडवा झाल्याने घाटातील संपूर्ण रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विशेषतः एसटी बस, मालवाहतूक वाहने आणि इतर मोठी वाहने घाटात अडकून पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, ट्रकने संपूर्ण मार्ग व्यापल्याने केवळ दुचाकी वाहनांना कसाबसा मार्ग काढत पुढे जाता येत होते. काही दुचाकीस्वारांनी अत्यंत सावधगिरीने वाहने बाजूने काढून प्रवास सुरू ठेवला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ट्रक बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.