देवगड मच्छी मार्केटसमोर अपघात | एकजण गंभीर जखमी

Edited by: उमेश बुचडे
Published on: May 20, 2024 14:20 PM
views 724  views

देवगड : देवगड बाजारपेठेत मच्छी मार्केट येथे बोलेरो पिकअप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार संदीप यशवंत परब (49, रा. इळये पाटथर) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी 12.45 वा. च्या सुमारास घडला. पोलिसांन कडून मिळालेला माहिती च्या आधारे जामसंडे कावलेवाडी येथील अमित आत्माराम कावले (34) हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एमएच 07, एजे 2224) घेऊन देवगड बाजारपेठेतून मोंडला जाण्यासाठी निघाले होते. याच दरम्यान संदीप परब हा मोटरसायकलने (मोटरसायकल क्र. एम.एच. 07, एपी 1831) देवगड बाजारपेठच्या दिशेने जात होते. देवगड बाजारपेठेतील मच्छी मार्केटसमोर अवघड वळणावर कावले यांची बोलेरो पिकअप गाडी आली असता समोरून भरधाव वेगाने आलेल्या संदीप परब याच्या मोटरसायकलची धडक बोलेरोच्या चालकाच्या बाजूने बसली.

यात संदीप परब हे रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून त्यांना गोवा बांबुळी येथे नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची फिर्याद अमित कावले यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली असून या अपघातप्रकारणी मोटरसायकलस्वार संदीप परब याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयीचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल उदय शिरगांवकर करत आहेत.