
वैभववाडी : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या अर्धवट अवस्थेत असून नाधवडे येथे सुरू असलेल्या कामादरम्यान ठेकेदाराने रस्त्यावर ठेवलेल्या साहित्यामुळे अपघात झाल्याचा आरोप पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी केला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच हा अपघात घडल्याचे त्यांनी सभेत स्पष्ट केले.
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा उपसभापती साची कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या सुरुवातीलाच विविध विभागांच्या खातेप्रमुखांच्या उपस्थितीबाबत पुन्हा चर्चा रंगली. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.सदस्य साधना नकाशे यांनी नाधवडे येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेला अपघात सभेच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर सदस्य देवानंद पालांडे यांनी संबंधित विभाग आणि ठेकेदाराच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
महत्त्वाच्या विभागांचे अधिकारी सभेला उपस्थित राहत नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी श्री. पालांडे यांनी केली.










