कुडाळ : बांव बागवाडी रेल्वे ब्रिज खाली मासेमारीसाठी गेलेल्या बाव येथील ३५ वर्षीय राजाराम अशोक परब हे पाय घसरून नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
बांबुळी येथील संतोष वरक यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, बांव येथील राजाराम अशोक परब, सुधीर बावकर व नारायण राऊत असे आम्ही मित्र दि. ३१ जानेवारी रोजी रात्रीच्या वेळेला मासेमारी करण्यासाठी बांव येथील कर्ली नदीत गेलो होतो. सुधीर बावकर व नारायण राऊत हे लहान फायबर होडीत बसून कर्ली नदीच्या पात्रात मासेमारी करत असताना बागवाडी रेल्वे ब्रिजच्या खाली नदी किनारी मी व राजाराम अशोक परब बसलो होतो.
दरम्यान राजाराम परब याच्या पायाला वाळू लागली होती. आणि ही वाळू धुण्यासाठी नदी पात्राच्या जवळ गेल्यावर त्याचा पाय शेवाळावर घसरून तो पाण्यात पडला. वाचवा, वाचवा असा आवाज दिला. मात्र सुधीर बावकर व नारायण राऊत हे त्या ठिकाणापासून थोडेसे दूर असल्यामुळे त्यांना सुद्धा येणे शक्य झाले नाही आणि राजाराम परब हे पाण्यात बुडाले त्यांचा शोध घेण्यात आला मात्र ते रात्री सापडून आले नाही आज १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडून आला याबाबत पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली आहे.