वेंगुर्ला : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव - सावरदेव येथे दुपारी २ च्या सुमारास डंपर पलटी होऊन रेडी- नागोळेवाडी येथील ३० वर्षीय संदीप सखाराम कृष्णाजी याचा मृत्यू झाला. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथुन साटेली मायनींग कडे संदीप कृष्णाजी हा डंपर घेऊन जात असताना आजगाव सावरदेव येथील रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कठाड्यावर डंपर चढून रस्त्याच्या बाजूने पलटी झाला यात संदीप हा चिरडला गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी स्थानिकांनी जेसीबीच्या साहाय्याने डंपर सरळ करुन संदीप याला बाहेर काढले. मात्र शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेतानाच त्याचा मृत्यू झाला.
यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक संदीप जाधव, उपनिरीक्षक तुकाराम जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश तावडे, पोलीस हवालदार हवालदार योगेश राऊळ, योगेश वेंगुर्लेकर, वाहतूक पोलीस मनोज परुळेकर, हवालदार सखाराम परब यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.
दरम्यान संदीप यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, भावजय, काका, काकी असा परिवार आहे. या घटनेने रेडी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरोडा उपजिल्हा रुग्णालय येथे संदीपच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.