
दोडामार्ग : आडाळी कोसमवाडी घाटीत डांबर वाहतूक करणाऱ्या टेम्पोला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. टेम्पो पलटी होऊन पुन्हा सरळ उभा राहिला. सुदैवाने टेम्पोतील चालक वाहक सुखरूप बचावले. मात्र टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कळणेतील खाण प्रकल्प सुरू असल्याने दोडामार्ग ते बांदा या मार्गावर माती वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ सुरू आहे. या वाहनांतील माती मार्गावर अनेक ठिकाणी पडल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास बांदाहून दोडामार्गच्या दिशेने डांबर वाहतूक करणारा टेम्पो येत होता. आडाळी घाटीतील कोसमवाडी येथे टेम्पो आला असता रस्त्यावर पडलेल्या खाणीच्या मातीमुळे चालकाचे टेम्पो वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टेम्पो दोन वेळा पलटी झाला व रस्त्यालगतच्या असलेल्या मोठ्या झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी टेम्पोतील चालक व वाहकाने जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. स्थानिक ग्रामस्थ व मार्गस्थ होणाऱ्यांनी बचावकार्य करत चालक व वाहकास सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने दोघेही अपघातातून बचावले.