वेंगुर्ला: -वेंगुर्ला-दाभोली मार्गे कुडाळ रस्त्यावर दाभोली हळदणकरवाडी येथील नारायण मंदिरजवळील वळणावर शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बोलेरो पिकअप व ओकेनावा ई बाईक यांच्यामध्ये झालेल्या अपघातात वेंगुर्ला-सुंदरभाटले येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला.
आज शनिवारी दुपारी दिनेश भोगले (वय-३४) हा आपल्या ताब्यातील ओकेनावा इलेक्ट्रीक दुचाकी (एमएच-०७-एक्यू-४३७७) घेऊन वेंगुर्ला येथून खानोली मार्गे वेतोरे येथे जात होता. तर आडेली-पेडणेकरवाडी येथील प्रमोद ज्ञानेश्वर सावळ (वय-३२) हा आपल्या ताब्यातील महिद्रा बोलेरो पिकअप (एमएच-०७/एजे-०३२३) घेऊन वेतोरे खानोली मार्गे वेंगुर्ला येथे येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने दाभोली-हळदणकरवाडी येथे आली असता त्यांच्या अपघात झाला. या अपघातात दिनेश भोगले याला गंभीर व किरकोळ दुखापत होऊन तो जागीच मयत झाला. यात ई बाईकचेही नुकसान झाले आहे. या अपघाताचे वृत्त समजताच हळदणकरवाडी ग्रामस्थांसहीत पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, सरपंच उदय गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य समाधान बांदवलकर, दादा गोवेकर, वायंगणी उपसरपंच रविद्र धोंड, दिलीप बांदवलकर, मनोज कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते अण्णा जोशी, उमेश जोशी, प्रकाश बांदवलकर, गणेश हळदणकर, सिद्धेश प्रभू, माजी सरपंच मनाली हळदणकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य जया पवार आदी ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. तर पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांनी वेंगुर्ला पोलीस स्टेशनशी संफ साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश कुबल, हवालदार भगवान चव्हाण, प्रथमेश पालकर आणि पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघाताची पहाणी करीत पंचनामा केला.
अपघातातील मयत दिनेश भोगले हा मूळचा कासार्डे येथील असून गेल्या दोन वर्षांपासून तो आपल्या आईसोबत वेंगुर्ला-सुंदरभाटले येथे भाड्याने राहत आहेत. तो अधूनमधून प्रविण शिदे यांच्या मार्केटींग व्यवसायामध्ये कामाला जात असे. वीस दिवसांपूर्वीच दिनेश याच्या वडिलांचे निधन झाले आहे. गावाकडे सर्व विधी पूर्ण करून दिनेश पुन्हा वेंगुर्ला येथे उदरनिर्वाहासाठी आला होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे. दिनेश हा मुकबधीर असून त्याची पत्नीही मुकबधीर आहे. तर दोन मुलींपैकी एका मुलीच्या हृदयाला छिद्र आहे. संपूर्ण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे. काही दिवसांपूर्वीच विजय भोगले यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले होते. त्या दुःखातून सावरलेही नसताना आता दिनेश याच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाचा आधारच नाहीसा झाला आहे.
दरम्यान, विरूद्ध बाजूने समोरून ठोकर देऊन, अपघात करून, त्या अपघातात दिनेश भोगले याला गंभीर व किरकोळ दुखापतीस व मृत्यूस तसेच वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ई बाईकचे मालक प्रविण रामचंद्र शिदे यांनी बोलेरो चालक प्रमोद सावळ याच्या विरोधात वेंगुर्ला पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.