२४ प्रवासी गंभीर, ट्रकचालक केबीनमध्ये अडकला

Edited by: विनायक गांवस
Published on: October 23, 2024 13:15 PM
views 1860  views

सावंतवाडी : माजगाव येथे पणजी-सावंतवाडी एसटी बस व छत्तीसगड येथील ट्रकमध्ये अपघात झाला. दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागांच यात नुकसान झाले. अपघातात एसटीतील चालक, वाहक यांच्यासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली‌. तर ट्रकचालक केबीनमध्ये अडकून पडला होता‌. ट्रक चालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. 


सायकांळी चार वाजण्याच्या सुमारास माजगाव येथे पणजी-सावंतवाडी एसटी बस (एम.एच.13 सीयू.8430) व  छत्तीसगड येथील ट्रकमध्ये (सीजी 07 सीजे 2689) मध्ये भिषण अपघात झाला. या अपघातात एसटी चालक प्रविण आचरेकर, वाहक राणे यांच्यासह २४ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली‌. नाका तोंडाला मार बसल्याने रक्तस्राव झाला. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की ट्रक चालक केबीनमध्ये अडकून पडला. त्याला गंभीर दुखापत झाली असून गोवा बांबोळी येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. आशिष सावंत, बाबू शिंदे अशी त्यांची नावे आहेत.तसेच सोबतच्या क्लिनरला गोवा येथे हलविले. अडकलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना मदतीसाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, माजगाव, इन्सुली, चराठा, बांदा, सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, युवक, ग्रामस्थांनी धाव घेतली. यामुळे बचावकार्याला गती मिळाली. 


जखमींवर प्राथमिक उपचार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले.वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. गिरीष चौगुले, डॉ. निखिल अवधूत आदी टीमने प्रथमोपचार केले. तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदींसह प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत जखमींना सहकार्य करत पंचनामा केला. सावंतवाडी आगराचे प्रांजल धुरी, रेश्मा सावंत, केके यादव आदींनी जखमी प्रवाशांचा महामंडळातर्फे मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबचता अर्ज भरून घेतला. घटनास्थळी उपस्थित पोलीसांनी पुढील सोपस्कार पार पडले. तर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.