वैभव नाईकांची ACB चौकशी ; शिवसेना आक्रमक

18 ऑक्टोबरला निषेध मोर्चा
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 13, 2022 19:12 PM
views 344  views

कणकवली : आमदार वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने मंगळवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी  निषेध मोर्चा आयोजित केला आहे. यामध्ये खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, माजी जिल्हा बँक अध्यक्ष  सतीश सावंत, अतुल रावराणे संदेश पारकर यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित राहणार असून  अघोषित आणीबाणी विरोधात कुडाळ शिवसेना शाखा ते एसीबी कार्यालय कुडाळ येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

आमदार वैभव नाईक यांची एसीबी कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत मालमत्तेची चौकशी लावून त्यांना नाहक गोवण्यात आलं आहे त्यामुळे आता प्रत्येक शिवसैनिक या विरोधात रस्त्यावर उतरणार असून भाजप व बाळासाहेब ठाकरे सेना म्हणजेच शिंदेसेना व भाजप  सरकार यांच्या विरोधात आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, प्रदीप बोरकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, नगरसेवक कन्हैया पारकर आदी उपस्थित होते.