
सावंतवाडी : सात दशकांची परंपरा लाभलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम जोमाने सुरू आहे. हे काम यापुढेही तसेच सुरू राहण्यासाठी पूर्व कार्यकर्त्यांनी पाॅवर बॅक म्हणून काम करावे असे आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान यांनी केले. कोकण प्रांतातून ३० हून अधिक कार्यकर्ते पूर्णवेळ म्हणून कामासाठी निघाले आहेत ही कौतुकाची बाब आहे. त्यामुळे विद्यार्थी परिषदेचे काम कोकणात जोमाने सुरू राहील, नव्याने विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते घडण्यास मदत होईल असेही ते म्हणाले. पूर्व कार्यकर्ता एकत्रिकरण सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी शिवराज बापट, शिवाजी दहिभावकर, हर्षदा देवधर, साईनाथ सीतावार, शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी चौहान म्हणाले, विद्यार्थी परिषदेने नेहमीच कार्यकर्त्यांना घडवण्याचे काम केले आहे. जे कोणी कार्यकर्ते आहेत ते परिषदेचे काम आहे हे कळल्यानंतर त्यांच्या अंगात विरश्री संचारते. त्यामुळे कुठचेही काम असू द्या तात्काळ मार्गी लागते. अखंड देशभरात आणि विदेशात सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम तितक्यात जोराने सुरू आहे. देशातील आणि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून या संघटनेची ओळख आहे. त्यामुळे ही संघटना दिवसेंदिवस मोठी व्हावी या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोकणात अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर या ठिकाणी अधिवेशन होईल की नाही अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र सर्व कार्यकर्त्यांनी तन-मन धन अर्पण करून त्या ठिकाणी काम केल्यामुळे हे अधिवेशन यशस्वी झाले. त्यामुळे यापुढेही असेच काम विद्यार्थी परिषदेच्या पूर्व कार्यकर्त्यांनी करावे आणि परिषदे पुढे नेण्यासाठी पाॅवर बॅंक म्हणून काम करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजी दहिगावकर यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, सर्वसामान्य विचारधारेतून कार्यकर्ता घडला आहे त्यामुळे कोणतीही जबाबदारी सहजपणे पेलण्याची या कार्यकर्त्यांमध्ये ताकद असते पूर्व कार्यकर्ते असले तरी त्यांना एकत्र येऊन विद्यार्थी परिषदेचे काम जोमाने पुढे येण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे. ही जबाबदारी पुढे देऊ असे ते म्हणाले. यावेळी हर्षदा देवधर म्हणाल्या, शिस्त मानणारी विद्यार्थी परिषद म्हणून अभाविपची ओळख आहे.त्यामुळे या माध्यमातून शिस्तबद्ध विद्यार्थी घडतात त्याचा फायदा रोजच्या जीवनात होतो. नव्याने आलेले कार्यकर्ते या प्रवाहात नक्कीच यशस्वी होती. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेले अधिवेशन यशस्वी झाले ही कौतुकाची बाब आहे. त्यापेक्षाही या कार्यकर्ता शिबिरासाठी मोठ्या संख्येने पूर्व कार्यकर्ता उपस्थित राहिले हे त्याहीपेक्षा कौतुकास्पद आहे.
यावेळी श्री. सीतावार यांनी उपस्थित राहणाऱ्या पूर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमात अशाच प्रकारे येथील विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे आणि परिषदेचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे ते म्हणाले. यावेळी मंदार भानुसे, श्रीकांत घुसगीकर, अतुल काळसेकर,शिवाजी खरवाल, नरेंद्र सावेकर,नीरज चौधकर,स्वप्नील सावंत,लालजी पागी,अभय भिडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते