
वैभववाडी : सुन-सास-याच्या नात्याला तालुक्यातील एका गावात काळीमा लागला आहे. मुलीप्रमाणे असणाऱ्या सास-याने सुनेवर लैंगिक अत्याचार केला आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. याप्रकरणी सासऱ्याविरोधात वैभववाडी पोलीसांनी गुन्हा दाखल करून त्याला रात्री उशिरा अटक केली आहे. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
तालुक्यातील एका गावातील मुलीचे तालुक्यातील दुसऱ्या एका गावातील मुलाशी डिसेंबर २०२३ मध्ये विवाह झाला. लग्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी विवाहीतेचा नवरा आणि सासू काही कामानिमित्त दुकानावर गेली होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घरी सासरा आणि सुनच होती. यावेळी सासऱ्याने सुनेवर घरात कुणीही नसल्याची संधी साधून अत्याचार केले. हा प्रकार पिडीतीने दुसऱ्या दिवशी आपल्या आईला फोनवरून सांगितला. त्यानंतर पिडीतेची आई मुलीच्या घरी आली. तिने हा प्रकार मुलीच्या सासुला सांगितला. मात्र तरीदेखील सासऱ्यांच्या वर्तनात काहीही सुधारणा झालेली नाही. तो सतत सुनेवर अत्याचार करीत होता. त्यानंतर सासऱ्याकडून हा प्रकार कुणाला सांगू नये म्हणून पिडीतेला मारहाण करण्यात आली.
दरम्यान यासंदर्भात पिडीतेने रात्री उशिरा सासऱ्याविरोधात वैभववाडीत पोलीसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुरुवारी रात्री उशिरा सासऱ्याला पोलीसांनी अटक केली. पोलीसांनी संशयित आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची कोठडी देण्यात आली.