
वैभववाडी : विजय रावराणे मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चाळीस वर्षावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत खांबाळे-आर्चिणे संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात रामेश्वर करूळ संघाचा खांबाळे संघाने पराभव केला. स्पर्धेतील तृतीय क्रमांक भगवती सांगुळवाडी संघाने पटकावला.
विजय रावराणे मित्रमंडळाच्या वतीने चाळीस वर्षावरील खेळाडुसाठी क्रिकेट स्पर्धेचे वैभववाडीत आयोजन केले होते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचा अतिंम सामना खांबाळे-आर्चिणे संघ आणि रामेश्वर करूळ या दोन तुल्यबळ संघात झाला. प्रथम फलदांजी करताना खांबाळे-आर्चिणे संघाने ५ षटकात बिनबाद ५९ धावा केल्या. यामध्ये एकनाथ पवार यांच्या ३८ आणि नरेंद्र गुरव यांच्या २१ धांवाचा समावेश होता. ६० धावांचे आव्हान घेवुन मैदानात उतरलेला रामेश्वर करूळ संघ अवघ्या तीस धावाच करू शकला. खांबाळे संघाने २९ धावांनी हा सामना जिंकला. खांबाळे-आर्चिणे संघाच्या बयाजी बुराण, उत्तम सुतार, सुहास लोके आणि नरेंद्र गुरव यांनी अचुक टप्प्यावर गोलदांजी केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकनाथ पवार यांना सामनावीरांचे पारीतोषिक देण्यात आले.
स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील, उपनगराध्यक्ष संजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, मंगेश लोके, विजय रावराणे, दिपक कदम, विश्राम राणे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या खांबाळे-आर्चिणे संघाला ११ हजार १११ रूपये व चषक, उपविजेत्या रामेश्वर करूळ संघाला ७ हजार ७७७ व चषक तर तृतीय भगवती संघाला ३ हजार रूपये व चषक देण्यात आला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल नागवेकर,नंदु राणे,गुरूनाथ गुरव,गोविंद रावराणे,रामा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.