अभिनयकुमार नितीन आसयेकर यांनी स्थापन केलं स्वतःच नाट्यमंडळ

मळगाव ग्रामस्थांतर्फे खास सन्मान
Edited by: विनायक गावस
Published on: June 04, 2023 15:02 PM
views 91  views

सावंतवाडी  : आजवर अनेक दशावतार नाट्य मंडळांमध्ये काम करत असताना माझ्या अभिनयासाठी तसेच कलेसाठी माझे अनेक सत्कार झाले. मात्र, आज स्वतः चं दशावतार लोककला मंडळ सुरू करत असताना गावच्यावतीने करण्यात आलेला या घरच्या सत्काराने मी भारावून गेलो आहे. गावातील थोरामोठ्यांच्या या आशीर्वादामुळे तसेच शुभेच्छामुळे पुढील वाटचालीत मला नक्कीच अधिक बळ मिळेल, अशा शब्दांत दशावतार क्षेत्रातील आजचे आघाडीचे महान कलावंत आभिनय कुमार नितीन आसयेकर यांनी आभार व्यक्त केले.

      दशावतार लोककलेत आपला आगळा वेगळा ठसा उमटवीत अभिनयकुमार म्हणून प्रसिद्ध झालेले मळगाव गावचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध दशावतार कलावंत नितीन आसयेकर यांनी श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ नावाने स्वतःची नाटक कंपनी सुरू केल्याबद्दल मळगाव ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. 

       यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब, मळगांव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. निकिता राऊळ, सौ. निकिता बुगडे, सौ. अनुजा खडपकर, श्रीमती सुभद्रा राणे, माजी सरपंच निलेश कुडव, भाजपा शक्ति केंद्रप्रमुख निळकंठ बुगडे, पत्रकार सुखदेव राऊळ, हरिश्चंद्र आसयेकर, विश्वनाथ गोसावी, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. 

      यावेळी निलेश कुडव, राजू परब, हनुमंत पेडणेकर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आमच्या गावचे सुपुत्र असलेले लोककलावंत नितीन आसयेकर आज स्वतः चे मंडळ सुरू करत असल्याने त्याचा आम्हाला गाव म्हणून सार्थ अभिमान आहे. या मंडळाच्या माध्यमातून गावातील इतरही कलावंतांना संधी मिळणार आहे. तसेच मंडळाच्या माध्यमातून मळगाव गावाचा जिल्ह्यात राज्यातच नव्हे तर देशपरदेशातही नावलौकिक होईल यासाठी आमच्या त्यांना नेहमीच शुभेच्छा राहतील अशा शब्दात यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.