
सावंतवाडी : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केल्याने राज्यातील वातावरण तापले आहे. अब्दुल सत्तार यांचे सुप्रिया सुळें विषयीचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरून आणि प्रसारमाध्यमांवर एकापाठोपाठ एक आक्रमक प्रतिक्रिया देण्याचा सपाटा लावला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
शिंदे सरकार मधील मंत्र्यांना महिलांच्या संबंधी आदरभाव दिसत नाही. शिंदे - फडणवीस सरकार मधील मंत्री महिलांच्या बाबतीत असंवेदनशील आहेत. गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. तर रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींबद्दल अब्दुल सत्तार यांच्यासारखे मंत्रीपदाला हपापलेले नेते काहीही बरळत आहेत. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा आम्ही सत्तार यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. खोके मिळाल्याने हे बोके हवेत आहेत. त्यांना हवेतून जमिनीवर उतरविण्याचे काम महाराष्ट्रातील जणता भविष्यकाळात करणाराच आहे.