
कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका या अत्यंत चुरशीच्या होणार असे चित्र दिसत आहे. कारण एका ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी तब्बल सहा उमेदवार इच्छुक आहेत. बिनविरोध करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीमध्ये या सर्व उमेदवारांनी आपण सरपंच पदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमही जाहीर झाला असून सदर निवडणूक शांततेत पार पाडण्याकरीता तसेच त्याबाबत सादक बाधक चर्चा व ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या अनुषंगाने बैठक आज आयोजित केली होती. ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सभेत सरपंच आफ्रोजा नावलेकर, उपसरपंच निरज मोरये, ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर, गवस साठविलकर, वृषाली मोरजकर, रेणूका पाटील, माजी सरपंच शशिकांत शेटये, पंढरीनाथ पारकर, विष्णू गुरव आदी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत सरपंच बिनविरोध निवड करण्यासाठी चर्चा करण्यात आली मात्र सरपंच पदासाठी उमेदवार म्हणून 6 उमेदवार इच्छुक असल्याचे दिसून आले. यामध्ये रविराज मोरजकर, रविंद्र तेली, सुरेश मोरये, हनुमंत म्हसकर, अरुण बापार्डेकर व निरज मोरये हे सरपंच पदासाठी इच्छुक असून त्यांनी आपण निवडणूक लढवणारच असा पवित्रा घेतला असल्याने नांदगाव ग्रामपंचायत निवडणूक ही अटळ असून ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसत आहे.