आरे देवीचीवाडी केंद्रशाळा देवगड तालुक्यात द्वितीय !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 25, 2024 13:45 PM
views 106  views

देवगड : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा‘ योजनेअंतर्गत ‘महाराष्ट्र शासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ असे अभियान रबविण्यात आले. या अभियानात जि. प. पूर्ण प्राथ. केंद्रशाळा आरे – देवीचीवाडी शाळेने देवगड तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवत २ लाख रुपयांचे पारितोषिक यावेळी या शाळेने प्राप्त केले आहे. 

या अभियानात शाळेने अध्ययन – अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शैक्षणिक गुणवत्ता, शालेय प्रशासनात सुव्यवस्था आणि सुसूत्रता, शाळेचे सौंदर्यीकरण, अमृतवाटिका, कचराव्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता गृह, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता मॉनिटर, व्यवसाय शिक्षण, अंगभूत कला – कौशल्य विकासासाठी उपक्रम, क्रीडागुणांचा विकास, क्षेत्रभेटी यांसारख्या विविध घटकांची परिणामकारक आणि प्रभावी अंमलबजावणी केल्याने शाळा या द्वितीय पुरस्कारासाठी पात्र ठरली.

शाळेच्या या यशाचे सारे श्रेय विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ यांचे असल्याचे मत मुख्याध्यापक परमेश्वर जाधवर यांनी सांगितले. तसेच शा. व्य. समितीच्या अध्यक्ष मानसी पाटोळे, उपाध्यक्ष राजू कदम, सरपंच ममता कदम, उपसरपंच रत्नदीप कांबळे,महेश पाटोळे, प्रकाश फाळके, अजित कांबळे, नितीन कोकम, शशिकांत कांबळे, सई कांबळे, अंगणवाडी सेविका अपेक्षा कोकम, वैभवी मालंडकर, श्रीम. संजना कोळंबेकर आदी शाळा प्रेमी ग्रामस्थ बंधू – भगिनी यांनी आपला बहुमोल वेळ शारीरिक, आर्थिक पाठबळ उभे केले त्याबद्दल आभार व्यक्त केले. पदवीधर शिक्षक  विवेक कुलकर्णी, श्रीम. कोमल राऊत, ज्ञानेश्वर सातपुते, भूषणकुमार जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच केंद्रप्रमुख, आनंद राजम यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार या प्रसंगी मानण्यात आले.