
दोडामार्ग : दोडामार्ग तहसील कार्यालय आवारात फिरणाऱ्या एका बेवारस महिलेला संविता आश्रमचा आधार मिळाला. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले आणि निराधारांचे आधार संदिप परब यांनी सर्व कागदांची पूर्तता करून त्या महिलेला शनिवारी सायंकाळी पणदूर येथील आश्रमात नेले.
जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत जिल्हात पणदूर येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय्य, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. दोडामार्ग बाजारपेठ ते तहसील कार्यालय परिसरात एक बेवारस, निराधार महिला फिरत असायची. ये जा करणाऱ्या गाड्यांना हात दाखवणे, बाजारपेठेमध्ये कोणाजवळ काहीही मागून खाणे अशा प्रकारे ती महिला आपला उदरनिर्वाह करायची. संविता आश्रमचे संदिप परब यांच्याशी संपर्क साधला व निराधार असलेल्या महिलेबाबत सर्व हकीकत सांगितली. संदिप परब हे शनिवारी दोडामार्ग मध्ये आले. त्यांनी महिलेला संविता आश्रमात नेण्याबाबतची पोलिस ठाण्यातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. निराधार, बेवारस असलेल्या महिलेला संदीप परब यांनी संविता आश्रमचा आधार दिला. यावेळी त्यांच्यासोबत प्रसाद आंगणे, केविन डिसोजा, प्रियांजली कदम, प्रांजल आंगणे, सोनाली साटम, प्रतीक्षा सावंत उपस्थित होते. यावेळी त्यांना दोडामार्ग पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले.