
रत्नागिरी : तालुक्यातील बसणी येथे दुचाकी आणि मोटारीच्या अपघातात स्वार गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रिक्षाने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी तालुक्यातील पाली- डोंगरेवाडी येथील हा स्वार असून सौरभ मधुकर काजरेकर (वय २५) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दि. १३ सप्टेंबरला दुपारी घडली.
जिल्हा रुग्णालयात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सौरभ शुक्रवारी दुपारी बसणीहून दुचाकी (गाडी क्र. एमएच- ०८ वाय ८५६२) सोबत वृषाली जगदीश धाडवे (वय २१ रा. उमरे चांदेराई, रत्नागिरी) हिला घेऊन रत्नागिरीकडे येत होता. त्यावेळी अचानक रत्नागिरीहून येणारी मोटारीवरील (गाडी क्र. एमएच-०३ बीएस ९१८१) चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी व मोटारीची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की, त्यामध्ये सौरभच्या डोक्यावरील हेल्मेट व दुचाकीच्या हॅंडलचा चक्काचूर झाला. सौरभ गंभीर जखमी झाला व वृषाली हिलाही दुखापत झाली. बसणी पोलिस पाटील यांच्यासह ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथील ग्रामस्थांनी सौरभ व वृषाली या दोघांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र सौरभच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर वृषालीला उपचारानंतर घरी सोडण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांच्या तपासात पोलिसांनी अपघातानंतर पलायन करणाऱ्या मोटार चालकास ताब्यात घेतले आहे. केतन नवल कोदे (वय २०, रा. देवगड, ता. सिंधुदुर्ग) असे संशयित मोटार चालकाचे नाव आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.