कारच्या धडकेत कणकवलीतील महिलेचा मृत्यु

कार चालकाचे पलायन
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 14, 2023 20:16 PM
views 7192  views

कणकवली : मुंबई गोवा महामार्गावर जानवली परबवाडी येथील फाट्यावर गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या  कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात  अंजली अमित साळवी (वय ३६, राहणार शिवाजीनगर, कणकवली) यांचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुंबई गोवा महामार्गावर जानवली परबवाडी येथे आपली बहिण नूतन दळवी यांना सोडण्यासाठी  अंजली साळवी या दुचाकी घेवून गेल्या होत्या. त्या ठिकाणी नूतन दळवी या दुचाकी वरुन खाली उतरल्यानंतर अचानक मागून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला ठोकर दिली. त्यात अंजली साळवी यांना जवळजवळ वीस ते तीस फूट फरपटत घेऊन कारचालक कारसह पसार झाला. अपघातात गँभीर जखमी झालेल्या अंजली साळवी यांना त्यांचे भावोजी ऍड .संतोष दळवी यांनी कारमधून कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात तत्काळ  उपचारासाठी दाखल केले.  मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या अपघाताचे वृत्त समजतात सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पाटील, पोलिस नाईक  रुपेश गुरव,स्वप्निल जाधव,भूषण सुतार आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करून अंजली साळवी यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आला. घटनेचे वृत्त समजतात कणकवली येथील रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अंजली साळवी हिच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, भाऊ, बहीण, आई असा परिवार आहे.

अपघाताबाबत माहिती समजताच रुग्णालयात ऍड.भालचंद्र पाटील,माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर,चेतन मुंज,चेतन अंधारी,बाळा पाटील,सिद्धेश बांदेकर,संकेत बांदेकर आदींनी धाव घेतली होती.