स्थानिक कलाकारांना प्रोत्साहनासाठी देवगडात सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे

नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांची आमदार नितेश राणे यांच्याकडे मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 11, 2023 09:53 AM
views 425  views

देवगड : नवीन स्थानिक कलाकार निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व नामवंत कलाकारांचे व्यावसायिक नाटयप्रयोग देवगडमध्ये होण्यासाठी देवगड-जामसंडे शहरात आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुसज्ज नाटयगृह उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली.


निवेदनात म्हटले आहे की, देवगड तालुक्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. अनेक गुणवंत कलाकार देवगड तालुक्यात आहे. त्यामध्ये नाटय क्षेत्रात व सिनेसृष्टीत आपले करियर करत आहेत. तरी देवगड मध्ये असे नवीन कलाकार निर्माण होण्यासाठी त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी व नामवंत कलाकारांचे व्यावसायिक नाटयप्रयोग देवगड मध्ये होण्यासाठी देवगड जामसंडे शहरात आपल्या स्तरावर महाराष्ट्र शासनाच्या मार्फत सुसज्ज नाटयगृह उभारण्यात यावे जेणेकरून आपल्या तालुक्यातील नागरिकांना व्यावसायिक व प्रायोगिक तत्त्वावरील नाटक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद उपभोगता येईल व स्थानिक कलावंतांसाठी आपली कला जगासमोर आणता येईल यासाठी देवगड मध्ये लवकरात लवकर नाटयगृह मंजूर करून घ्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे.