
चिपळूण : “दासानुदासी वेण्णा आणि गिरीधर प्यासी मेरा या दोघींच्या अंगी कठोर वैराग्य होतं. दोघीही तपस्विनी असल्याने चिंतन-अभ्यास करून भान जपले होते. रूढी-परंपरांच्या पलीकडे जाण्याची ताकद त्यांनी मिळवली होती. गुरुभक्ती आणि देवभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते,” अशा शब्दांत प्रा. अंजली बर्वे यांनी समर्थ रामदासांच्या शिष्या वेण्णा आणि साध्वी मीराबाई यांच्या भक्तीचा संदर्भ उपस्थित केला.
लक्ष्मीनारायण मंदिरातील श्रीकृष्ण व्याख्यानमालेच्या ९७व्या वर्षातील सोमवारी आयोजित तिसऱ्या पुष्पगुंफणीत प्रा. बर्वे यांनी “समर्थ शिष्या वेण्णा आणि मीरा” या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रा. बर्वे यांचा परिचय मधुरा बापट यांनी करून दिला, तर माजी विश्वस्त सुजाता देवधर यांनी आभार मानले.
प्रा. बर्वे यांनी सांगितले की, समर्थांच्या शिष्या वेण्णा या सधन घरातील असून नकळत्या वयातच वैधव्य आले होते. वैधव्याचा अर्थही न कळालेल्या या तरुणीला समर्थ रामदासांची भेट झाली आणि त्या त्यांच्या शिष्या झाल्या. समर्थांनी त्यांना मठाच्या कामात सहभागी करून घेतले, गायनकला, वाचन आणि कीर्तन शिकवले. वेण्णाबाईंनी ‘सीता स्वयंवर’ हे सुंदर, सुबोध आणि प्रासादिक काव्य रचले, ज्यासाठी त्यांनी वाल्मिकी रामायणाचा सखोल अभ्यास केला. शेवटपर्यंत त्या कीर्तनसेवेत मग्न राहून समर्थांच्या चरणी प्राण अर्पण करून, जणू माहेरी गेल्यासारख्या या जगाचा निरोप घेतला. बालपणी रामभक्तीमुळे त्यांच्या नातेवाईकांनी विषप्रयोग केला होता, मात्र समर्थांच्या कृपेने त्या वाचल्या.
यानंतर प्रा. बर्वे यांनी साध्वी मीराबाईंच्या जीवनाचा मागोवा घेतला. राजस्थानातील मेवाड राजघराण्यात जन्मलेल्या मीराबाई लहानपणापासूनच कृष्णभक्तीत रंगल्या होत्या. पाच-सहा वर्षांच्या वयातच त्यांनी खेळण्याच्या पाटावर बसवलेल्या श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पती मानले. विवाहानंतरही त्यांची कृष्णभक्ती अखंड राहिली. राजघराण्याच्या परंपरा, राजकारणातील गुंतागुंत आणि दरबारी जीवनातील दिखावा यापासून त्यांनी अलिप्तता राखली.
मीराबाईंच्या कृष्णभक्तीला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यांच्या भक्तीमुळे घरातील व नातेवाईकांपैकी काहींनी त्यांना विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी त्या दैवी कृपेने वाचल्या. त्यांनी आपल्या रचनांमधून आणि भजनांमधून कृष्णाला प्रियकर, पती, मित्र आणि आराध्य मानले. त्यांच्या कवितांमध्ये एक भक्तीभावाचा उत्कट आविष्कार दिसतो. मीराबाईंची भजने आजही भारतभर गायली जातात.
दोघीही विधवा असून, वाचन, चिंतन, अभ्यास आणि अखंड साधनेत रमल्या. वेण्णा आणि मीरा या दोघींनीही वैराग्याचा आणि भक्तीचा अद्वितीय संगम साकारला. “भक्ती म्हणजे केवळ भावनांची लाट नसून, त्यामागील वैराग्य, दृढनिश्चय आणि अखंड साधना यांचा संगम आहे, हे वेण्णा आणि मीरा यांनी दाखवून दिले,” असे प्रा. बर्वे यांनी नमूद केले.
या व्याख्यानाला मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. श्रोत्यांनी समर्थ रामदासांच्या शिष्येच्या कथा आणि मीराबाईंच्या कृष्णभक्तीच्या आठवणी मनोभावे ऐकल्या.