वेंगुर्ल्यात अनोखा फुलपाखरू उत्सव !

जैवविविधतेचे जतन व संवर्धन करण्याची युवा पिढीची जबाबदारी : मुख्याधिकारी परितोष कंकाळ
Edited by: दिपेश परब
Published on: September 15, 2023 19:34 PM
views 138  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला शहराला समृद्ध अशी जैवविविधता लाभली असून याचे संवर्धन करण्याची महत्वाची भूमिका वेंगुर्ला नगरपरिषद बजावत आहे. अन्नसाखळीत फूलपाखराचे मोठे योगदान आहे. ते ओळखण्यासाठी हा कार्यक्रम वेंगुर्ले न. प. ने आयोजित केला आहे. संपुर्ण जगात जैवविविधतेच्या एकुण 12 हॉटस्पॉट आहेत. त्यातील भारतात दोन आहेत. ते सहयाद्रीच्या पट्टयात आहेत. या जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे हि आजच्या युवा पीढीची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ले न. प. चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी फुलपाखरू उत्सव प्रसंगी केले आहे.


     माझी वसुंधरा ४.० अंतर्गत वेंगुर्ले न. प., ग्रीन नेचर क्लब व बॅ बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नाटकार मधुसुदन कालेलकर बहूउद्देशिय सभागृह येथे आयोजित फूलपाखरु उत्सव उद्घाटन प्रसंगी मुख्याधिकारी कंकाळ बोलत होते. फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता समजून घेणे, फुलपाखरांची वैज्ञानिक मोजणी कशी करावी याबाबतची माहिती देणे, फुलपाखरांच्या मधूरस आणि खादय वनस्पतींचे संवर्धन करणे या हेतूने हा फुलपाखरु उत्‍सव आयोजित करण्यात आला होता. 

    या उत्सवाचे उद्घाटन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने व झाडांना पाणी देवून करण्यात आले. यावेळी न. प.चे ब्रँड अँबेसिडर सुनिल नांदोस्कर, पर्यावरण दूत प्रा. धनश्री पाटील, प्रा. देविदास आरोलकर, माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, सुहास गवंडळकर, श्रेया मयेकर, मार्गदर्शक नितीन कवठणकर, करिश्मा मोहिते, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांच्यासाहित नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

   फूलपाखरु हा विषय केवळ आपल्या अंगणा पूरता मर्यादित नसून तो जागतिक आहे. त्यावर आज जगातील शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हयात आज भरपूर जैवविविधता आहे. ती जपणे आवश्यक आहे. आज सर्वत्र तणनाशक फवारण्या करण्यात येतात त्यामुळे फूलपाखरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे अनावश्यक तणनाशक फवारण्या थांबवणे गरजेचे असल्याचे धनश्री पाटील यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले.

   सुनिल नांदोस्कर यांनी यावेळी जैवविविधते संदर्भात मार्गदर्शन करताना मुलांनी `एक होता कार्वर' हे पुस्तक आवर्जुन वाचावे असे आवाहन केले. माजी नगराध्यक्ष दिलिप गिरप यांनीहि यावेळी मनोगत व्यक्त केले. 

    या कार्यक्रमात प्रि. एम.आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्‍या लहान मुलींनी फुलपाखरांची वेशभूषा करुन सुंदर असे  नृत्‍य सादर करुन उपस्थितांची  मने जिंकली. यानंतर बॅ. खर्डेकर महाविदयालयाचे माजी विदयार्थी नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी वेंगुर्लातील फुलपाखरांची विविधता जाणून घेणे तसेच फुलपाखरांची नोंदी घेणे व संवर्धन करणे याबाबत बहुमुल्‍य असे मार्गदर्शन केले. यावेळी बॅ. खर्डेकर महाविदयालय, वेंगुर्ला हायस्‍कूल, पाटकर हायस्‍कूल, तालुका शाळा नं. ४, वडखोल शाळा, याचे शिक्षक व विदयार्थी बहुसंख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन न प चे अधिकारी वैभव म्हाकवेकर यांनी केले.