आडाळीत 'ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा' अनोखा उपक्रम

Edited by: संदीप देसाई
Published on: July 27, 2023 18:29 PM
views 88  views

दोडामार्ग :  नैसर्गिक व पौष्टिक आहार काय असतो, रसायन मुक्त आहार सेवन करून आपण कसे निरोगी राहू शकतो या मुख्य उद्देशान आडाळी गावच्या प्राथमिक शाळेत ' ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा ' हा आगळा वेगळा कार्यक्रम नुकताच  घेण्यात आला.  

आडाळी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सपन्न झाला. विद्यार्थ्यांना रानभाज्यांची ओळख होऊन दैनंदिन आहारात त्यांचा वापर वाढविण्यासाठी रानभाज्यांचे हे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होत. हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने भावी पिढीसाठी उपयुक्त असल्याचे यावेळी सांगत पालकांनी विशेष कौतुक केलं. सरपंच पराग गांवकर यांनी ' ओळख रानभाज्यांची, आहार पौष्टिकतेचा '  ही संकल्पना यावेळी स्पष्ट केली.

ते म्हणाले ' जुन्या पिढीच्या तुलनेत आजच्या विद्यार्थ्यांचा जंगलाशी पर्यायाने निसर्गाशी संपर्क कमी होत आहॆ. त्यामुळे निसर्गत: असलेल्या अनेक चांगल्या गोष्टींची ओळख देखील आपण हरवत चाललो आहोत. त्यामुळे सहज, सकस, स्वस्त, निरोगी आणि शुद्ध अशा भाज्यांचा आहारातील वापर वाढवायचा असेल तर मुलांना रानभाज्यांची ओळख करून द्यायला हवी. त्यासाठी हे प्रदर्शन भरवले आहॆ. हा केवळ उपक्रम न रहाता दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा, यासाठी आपण व पालकांनी पुढाकार घेऊया, असे आवाहन केले. या प्रदर्शनात पालक व ग्रामस्थांनी दहाहून अधिक रानभाज्या  मांडल्या.

तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांनी आणलेल्या भाजीची माहिती दिली. उपसरपंच परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य संजना गांवकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आरती गांवकर, माजी अध्यक्ष रामा मेस्त्री, निसर्गप्रेमी भिवा गांवकर यांनी भाज्यांची रोजच्या आहारातील उपयुक्तता याबद्दल माहिती दिली. मुख्याध्यापक सायली देसाई, दर्शना केसरकर यांनी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केल्याबद्दल उपस्थितानी कौतुक केले.