रस्त्यावर झाड कोसळलं ; कुडाळच्या नगराध्यक्षा मदतीला धावल्या

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 30, 2025 12:37 PM
views 254  views

कुडाळ : शहरातील कुडाळ-नाबरवाडी रस्त्यावर काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे एक मोठे झाड कोसळले. यामुळे बगळे यांच्या घराचे नुकसान झाले, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.  घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी तातडीने आपत्कालीन टीमसह घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.

अतिवृष्टीमुळे कोसळलेले झाड खूप मोठे होते, त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. रात्रीच्या वेळी नगराध्यक्षा बांदेकर-शिरवलकर यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून झाड कापून रस्ता तात्पुरता मोकळा केला. झाडाचा मोठा भाग घरावर पडलेला असून विजेचा खांब तुटल्याने त्या भागात काळोख आहे. झाडाचा मोठा भाग अजूनही बाजूला असल्याने उर्वरित काम सकाळी करण्यात येणार आहे.

यावेळी नगराध्यक्षांसोबत श्रेया गवंडे, राजू गवंडे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना आनंद शिरवकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नगरपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. रात्रीच्या वेळी तातडीने मदतकार्य सुरू केल्यामुळे नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.