
देवगड : देवगड येथील दीक्षित फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक क्षेत्राशी निगडित नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'शैक्षणिक विचार मंच' यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत . यामध्ये शिष्यवृत्ती वाटप, निबंध स्पर्धा, खो-खो स्पर्धा व रंगभरण स्पर्धांचा समावेश आहे. याची सुरूवात येत्या सात जुलैपासून होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी येथे दिली.फाउंडेशनच्या वर्धापनदिनी तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून प्रत्येकी एक आदर्श शिक्षक निवडून त्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. शैक्षणिक विचार मंच अध्यक्ष नारायण माने, माधव यादव, हिराचंद तानवडे, आसावरी कदम उपस्थित होते. दीक्षित म्हणाले, “फाउंडेशनच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात विशेष लक्ष देणार आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि गरजांवर लक्ष देऊन त्यातून शैक्षणिक विकास साधण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी 'शैक्षणिक विचार मंच' या स्वतंत्र विभागाची स्थापना केली आहे. निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या जन्मदिवसानिमित्त अकरावीमधील विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रूपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयातून आर्थिकदृष्ट्या दोन गरीब अशा एकूण २२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजाराचे वाटप करण्यात येईल. हा कार्यक्रम सात जुलैला येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये घेण्यात येईल. २५ ऑगस्टला पुण्यतिथीनिमित्त माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात येईल. सहावी ते आठवी आणि नववी-दहावी अशा दोन गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धकांना फाउंडेशनतर्फे कागद पुरवून उत्स्फूतपणे निबंध लिहून घेतला जाईल. यातील विद्यार्थ्यांना छोट्या गटात अनुक्रमे, ५००, ३०० व २०० रुपये रोख आणि प्रशस्तीपत्रक तसेच मोठ्या गटात अनुक्रमे ७००, ५०० व ३०० रुपये रोख आणि प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. गणपतीपूर्वी चित्रकलेतील परीक्षांसाठी चांगले कला मार्गदर्शक बोलावून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहे.
शैक्षणिक विचार मंच कार्यकारिणी ची देखील या वेळी जाहीर करण्यात आली त्यामध्ये दीक्षित फाउंडेशनच्या शैक्षणिक विचार मंचच्या अध्यक्षपदी नारायण माने यांची निवड घोषित करण्यात आली.अध्यक्ष नारायण माने, सचिव माधव यादव (कुणकेश्वर), समन्वयक हिराचंद तानवडे (पडेल), सदस्य शमसुद्दीन आत्तार (शिरगांव), महादेव घोलराखे (देवगड), गणेश रानडे (सौंदाळे), संजय गोगटे (जामसंडे), आसावरी कदम (मोंड), सुरेश देवळेकर (पुरळ)आदींचा या कार्यकारणी मध्ये सहभाग असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले आहे.