
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा 38 वा व्यापारी एकता मेळावा 31 जानेवारी रोजी देवगड तालुका व्यापारी संघाच्यावतीने शेठ म.ग हायस्कूलच्या प्रांगणात सपन्न होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन रवींद्र माणगावे (अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंड अँड ऍग्री) यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख वक्ते म्हणून रामभाऊ भोगले (चेअरमन अप्लायमेंट इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ग्रुप माजी अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर) श्री महेश चव्हाण (संस्थापक आय ४१ इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड )तसेच माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. जिल्हा व्यापारी महासंघाच्या व्यापारी एकता मेळाव्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये व्यापार, उद्योग, पर्यटन, महिला उद्योजकता व सामाजिक कार्य या क्षेत्रांतील पुरस्कारांचा समावेश आहे. यामध्ये देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने यावर्षी दोन पुरस्कार द्यायचे निश्चित केले असून यातील पहिला पुरस्कार आदर्श पर्यटन उद्योजक पुरस्कार श्रीकांत जोईल व वैष्णवी जोईल या बंधू-भगिनींना तर आपल्याच शेतातील मालाला शेती आणि व्यापार याची सांगड घालणाऱ्या यशस्वी उद्योजक प्रसन्ना गोगटे यांना आदर्श व्यापारी व शेतकरी पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे माहिती देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांनी दिली.
38 व्या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने देवगड तालुका व्यापारी संघाच्या वतीने देवगड येथील व्यापारी संघाच्या कार्यालयात जिल्हा व्यापारी महासंघ व तालुका व्यापारी संघ अशी संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली त्यावेळी कदम यांनी माहिती दिली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर,जिल्हा कार्यवाह नितीन वाळके,देवगड तालुकाध्यक्ष शैलेश कदम , प्रमोद नलावडे, मिलिंद मोहिते,मिलिंद कुबल, प्रियांका साळसकर, दयाळ गावकर आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा अत्यंत मानाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा देवगड तालुक्यातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यापारी राजाराम कदम यांना जाहीर करण्यात आला आहे.
सचोटीने व्यापार करत समाजसेवेला प्राधान्य देणाऱ्या आणि व्यापारी संघटनेच्या कार्यात तन-मन-धनाने योगदान देणाऱ्या कदम यांना हा पुरस्कार खासदार नारायण राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी महासंघाची स्वतंत्र निवड समिती तसेच देवगड तालुका कार्यकारिणीने शिफारस केली होती.महासंघाचा दुसरा पुरस्कार कै. माई ओरसकर स्मृती आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार देवगड येथील श्रीमती सुषमा सदानंद देसाई ,तिसरा पुरस्कार कै. भाईसाहेब भोगले स्मृती पहिल्या पिढीचा युवा उद्योजक पुरस्कार देवगड येथील विजय उर्फ बंटी प्रमोद कदम यांना जाहीर झाला आहे.पर्यटन व सेवा उद्योगाशी संबंधित सेवाव्रती कै. बापू नाईक स्मृती पुरस्कार यंदा दोडामार्ग येथील ‘रानमाणूस’ म्हणून परिचित असलेले प्रसाद गावडे यांना जाहीर झाला आहे. याशिवाय महासंघाचा उत्कृष्ट तालुकाध्यक्ष मालवणचे तालुकाध्यक्ष उमेश नेरुरकर यांना देण्यात येणार आहे. उमेश शिरसाट स्मृती आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तसेच कै. प्रतापराव केनवडेकर स्मृती आदर्श ग्रामीण व्यापारी संघ पुरस्कार याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.यंदा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम अभिनव पद्धतीने होणार असून, प्रत्येक पुरस्कारार्थीच्या कार्यावर आधारित लघु मुलाखती व क्षणचित्रे डिजिटल स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत. त्यानंतर शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे .अशी माहिती जिल्हा कार्यवाह नितीन वाळके यांनी दिली आहे.










