जालना येथील पर्यटकाचा तारकर्ली समुद्रात बुडून मृत्यू

Edited by: प्रतिनिधी
Published on: October 09, 2022 19:36 PM
views 590  views

मालवण : तारकर्ली येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या भिवपूर- भोकरदन- जालना येथील सचिन एकनाथ जाधव २२ या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पर्यटन हंगामाच्या सुरुवातीलाच ही घटना घडली आहे.

याबाबतची माहिती अशी- औरंगाबाद येथून सात जणांचा पर्यटकांचा समूह आज दुपारी तारकर्ली येथे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते. यात सचिन एकनाथ जाधव रा. जालना, सचिन शिवाजी देठे, योगेश पुंडलिक दळवी, योगेश आत्माराम खिल्लारे, विनोद काकासाहेब खिल्लारे, विठ्ठल विष्णू दळवी, चालक रमेश एकनाथ काटकर सर्व रा. औरंगाबाद यांचा समावेश होता. यातील चालक सोडून उर्वरित सहाजण दुपारी पर्यटन केंद्रासमोरील सुमद्रात उतरले. यातील पाच जण काही वेळातच समुद्रातून बाहेर आले तर सचिन जाधव हा एकटाच समुद्रात होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सचिन हा बुडत असल्याचे त्यांच्या साथीदारांना दिसून येताच त्यांनी आरडाओरड केली असता स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.  वैभव सावंत, दशरथ चव्हाण यांनी समुद्रात जात बुडत असलेल्या सचिन जाधव याला किनाऱ्यावर आणले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. रामा चोपडेकर, भानुदास येरागी, प्रभाकर वाळवे, जयवंत सावंत, वैभव सावंत, मनोज खोबरेकर, दत्तराज चव्हाण, संजय तयारी, प्रफुल्ल मांजरेकर, उल्हास तांडेल यांनी मदतकार्य केले.

या घटनेची माहिती पोलीस पाटील भानुदास येरागी यांना देताच त्यांनी घटनास्थळी येत माहिती घेतली. या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक विजय यादव, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, राजन पाटील, कैलास ढोले यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. हे पर्यटक किनाऱ्यावर मद्यपान करत होते. मद्यपान करूनच सचिन व त्याचे सहकारी समुद्रात उतरले असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.