
सावंतवाडी : खासकीलवाडा-चराठा येथील कामाक्षी रवी नायर यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. हा प्रकार आज उघड झाला. यात देवाची भांडी, चांदीचे दागिने असा सुमारे सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पळविला. याबाबतची फिर्याद नायर यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणे अंमलदार डुमिंग डिसोझा यांनी ही माहिती दिली.
अधिक माहिती अशी, की कामाक्षी रवी नायर या मूळच्या कर्नाटक येथील आहेत. त्या काही कामानिमित्त २१ फेब्रुवारीला कर्नाटक येथे गेल्या होत्या. सोमवारी त्या घरी आल्या असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्थ आढळले. घरातील कपाट उघड्या अवस्थेत दिसून आली. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घरातील चांदीचे दागिने, पूजा साहित्य आदी मुद्देमाल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नायर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस करीत आहेत.