
दोडामार्ग : कॉलेज जीवनात आपल्या लेखन कलेला पालवी फुटते. कलागुणांना बहर येतो.यावेळी नेमके काय वाचावे लिहावे हे समजले की आपण घडत जातो. आणि आपल्या कर्तबगारीने जीवनाची रेषा मोठी करता येते. असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, आपण कायम वाचन लिखान केले पाहिजे.आपल्या जीवनाची विचारधारा आणि आपला वारसा आदर्शवत असला पाहिजे. आपल्या वाचन लिखाणाचा कल शोषितांच्या व्यथा वेदना मांडणाऱ्या असल्या पाहिजेत. हे सर्व गुण अभिजीत हेगशेट्ये यांच्याकडे असल्याने दोडामार्ग सारख्या दुर्गम डोंगराळ आणि विकास पासून कोसो दूर असणाऱ्या जंगलयुक्त प्रदेशात 25 वर्षांपूर्वी हे महाविद्यालय स्थापन केले. अशा प्रदेशात 25 वर्षे एखाध्ये युनिट चालवणे आणि त्याचा विकास करणे सोपे नाही.पण त्यांनी ते करून दाखवले. कारण त्यांच्याकडे भविष्याची दृष्टी होती. व्हिजन होते. तसे व्हिजन आपल्याकडे असले पाहिजे.
प्राचार्य डॉ.सुभाष सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचा 25 वर्षातील विकासाचा धावता आढावा घेतला. यावेळी विवेकानंद नाईक, राजेंद्र केरकर, डॉ. हेमंत पेडणेकर, नंदकुमार नाईक, सूचन कोरगावकर, रत्नदीप गवस,भूषण सावंत, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये म्हणाले की या परिसरातील मुला-मुलींना शिक्षण देण्याची संधी मिळाली. त्यांना कला वाणिज्य शाखेबरोबरच पूर्वी कॉम्प्युटर सायन्स आणि आता हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून रोजगाराभिमुख शिक्षण दिल्याने त्यांना शंभर टक्के रोजगार मिळतो. याचा आंनद आम्हला आहे.या परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन आपले करिअर घडवले पाहिजे.
यावेळी महाविद्यालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या वार्षिक अंक सुरंगी व नवदर्पण या अंकाबरोबरच अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस यु दरेकर व वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. आर एस इंगळे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशानही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी. डी. गाथाडे यांनी केले.तर उपस्थित यांचे आभार प्रा.डॉ. संजय खडपकर यांनी मानले.