
सावंतवाडी : भारत देशासाठी आपल्या प्राण्याची आहुती देणारे कलंबिस्त येथील भारत-पाक युद्धातील शहीद हवालदार बाबली राजगे यांच्या पत्नी ' वीरनारी ' श्रीमती सरस्वतीबाई बाबली राजगे यांचा यांच्या 88 व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन, मुंबई यांच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार असल्याचे दळवी ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
शहीद हवालदार बाबली राजगे यांना 23 सप्टेंबर 1965 रोजी भारत पाक युद्धात हौतात्म्य आले. यावर्षी भारत-पाक युद्धाला ६० वर्षे पूर्ण होत असून कारगिल युद्धाला ही २५ वर्षे पूर्ण होत आहेत. १ जुलै रोजी वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांचा ८८ वा वाढदिवस आहे. या त्रिवेणी संगम साधून विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशन मुंबई हे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई, (NSS) व सैनिक कल्याण विभाग सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सोमवार दिनांक १ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सरस्वतीबाई राजगे यांचा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू व युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते प्रतीकात्मक चांदीचा लामन दिवा भेट देऊन जाहीर सत्कार करणार आहेत. अशी माहिती दळवी यांनी दिली. पाटबंधारे विभागाचे निवृत्त वरिष्ठ लिपिक बाळा राजगे यांच्या त्या मातोश्री तर ॲड. सुशील राजगे यांच्या त्या आजी आहेत.