असलदे गावच्या नव्या सजेवर स्वतंत्र तलाठी नेमणूक करावी

कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना ग्रामस्थांचे नियोजन | अन्यथा आंदोलनाचा इशारा
Edited by:
Published on: July 26, 2024 14:00 PM
views 102  views

कणकवली : महसुल विभागाकडून नव्याने कणकवली तालुक्यातील नांदगाव मंडळ अधिकारी कार्यालय अंतर्गत असलदे सजेला नव्याने मंजुरी मिळाली आहे. मात्र, दोन वर्षे होवून गेली तरीही असलदे गावात तलाठी कार्यालयात महसुली दफ्तर व तलाठी उपलब्ध झालेले नाहीत. आपण असलदे गावामध्ये नवीन मंजुर सजेनुसार स्वतंत्र तलाठी नेमणूक करावी , अशी मागणी असलदे ग्रामस्थांच्यावतीने सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिका-यांकडे करण्यात आली आहे. यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी येत्या आचारसंहितेपूर्वी नवीन सजेवर तलाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. अन्यथा एक महिन्यानंतर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तसेच यावेळी अतिवृष्टीत गावात काजू बागायती , भाताच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. 

कणकवली उपविभागीय कार्यालय येथे कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची असलदे ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी तलाठी मागणीचे निवेदन प्रांताधिका-यांना सरपंच चंद्रकांत डामरे , सोसायटी चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , सोसायटी संचालक उदय परब ,छत्रुघ्न डामरे , गणेश काटकर , महेश लोके , रघुनाथ लोके , मनोज लोके , प्रकाश आचरेकर , दिनेश शिंदे , विजय आचरेकर , संदीप शिंदे , वासुदेव दळवी , संतोष मयेकर , रोहीत परब , विजय मयेकर , ग्रामसेवक संजय तांबे , मधुसुदन परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.    

यावेळी तलाठी कार्यालय गावातच सुरु झाले तर विद्यार्थ्यांच्या उत्पन्न दाखल्यांवर आवश्यक असलेले अहवाल जागेवर मिळतील. तसेच गावातील शेतक-यांसाठी पीक पाहणी नोंदणी , सातबारा , आठ अ , वारसतपास व अन्य सेवा शेतकरी व सर्व सामान्य नागरीकांना गावातच मिळाव्यात, अशी मागणी सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे केली. तसेच वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. असलदे गावात काजु बागायतदार मोठ्या प्रमाणात असून वादळी वा-यामुळे काजुची झाडे कोसळून पडली आहेत . तरी या शेतक-यांचे पंचनामे तातडीने करावेत , अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली. श्री. कातकर यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तालुका कृषी अधिका-यांना फोनद्वारे दिले.