कुडाळसाठी स्वतंत्र पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय उभारलं जाणार ?

प्रस्ताव दाखल
Edited by: कुडाळ प्रतिनिधी
Published on: December 30, 2024 18:53 PM
views 255  views

कुडाळ :  कुडाळसाठी आता स्वतंत्र पोलीस उपविभागीय अधिकारी मिळणार असून यासाठी कुडाळ एमआयडीसी येथील २ एकर असलेल्या जमिनीमध्ये कार्यालय व पोलीस कॉलनी उभारणी बाबत प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता सद्यस्थिती तीन प्रांताधिकारी आहेत. आता तीन पोलिस उपविभागीय अधिकारी होणार आहे. जिल्ह्यामध्ये वाढती लोकसंख्या तसेच गुन्ह्यांचा तपास वाढावा. गुन्हे कमी व्हावे अशा विविध नागरिकांच्या संरक्षणाच्या हितार्थ पोलीस उपविभागीय अधिकारी पद वाढविण्यात आले आहे. हे पोलीस विभागीय अधिकारी कुडाळसाठी देण्यात आले असून याचे मुख्यालय कुडाळ शहरात असणार आहे. या पोलीस उपविभागीय कार्यालयासाठी कुडाळ एमआयडीसी येथे असलेल्या दोन एकर जमिनीमध्ये इमारत तसेच पोलीस कॉलनी उभी केली जाणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे कुडाळ येथे पोलीस उपविभागीय कार्यालय झाल्यावर कुडाळ व मालवण या दोन तालुक्यासाठी हे स्वतंत्र कार्यालय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सावंतवाडी व कणकवली येथे पोलीस उपविभागीय कार्यालय व अधिकारी आहेत यामध्ये वाढ होऊन कुडाळ येथे पोलीस उपविभागीय अधिकारी मिळणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस विभागीय अधिकारी लागतात हा भार सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यावर येत होता. मात्र आता हा भार कमी होणार आहे. या पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस कॉलनीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे. 

पोलीस यंत्रणा संरक्षणाबरोबरच लोकांना सेवा देण्यासाठी आता तत्पर झाली आहे. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांचा पेट्रोल पंप व सीएनजी गॅस केंद्र येणार आहे. हा प्रस्ताव देण्यात आला असून लवकरच त्याला परवानगी मिळेल त्यामुळे कुडाळ शहरात अजून एका पेट्रोल पंप सह सीएनजी केंद्राची केंद्र जनतेला मिळणार आहे. ओरोस येथील पेट्रोल पंप येथे सुद्धा सीएनजी केंद्र करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.