अस्सल गोंयकारी स्वादासाठी स्वयंपूर्ण ई - बझार

Edited by:
Published on: November 25, 2023 14:11 PM
views 200  views

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वयंपूर्ण गोवा अभियानाअंतर्गत स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ई - बझार संकल्पना राबवली आहे. www.swayampurnagoa.com या वेबसाईटवर जाऊन आता तुम्ही अस्लल गोंयकारी स्वादाचे पदार्थ आणि इतर वस्तू खरेदी करू शकतात. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते शुक्रवारी या स्वयंपूर्ण ई-बाजारचे उदघाटन करण्यात आले. गणेश चतुर्थी काळात गोवा सरकारने प्रथमच सुरू केलेल्या चवथ ई-बाजारला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या बाजारच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने फराळाची विक्री करून राज्यभरातील महिलांनी वैयक्तिकरित्या तसेच महिला स्वयंसहाय्य गटांनी मोठा आर्थिक फायदा मिळवला. त्यामुळे यापुढे वर्षभर अशाप्रकारचा ई-बाजार भरवण्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी निश्चित केले होते. त्यानुसार शुक्रवारपासून या बाजारासाठीच्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. 

राज्य सरकारने सुरू केलेला हा ई-बाजार फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणेच काम करणार आहे. त्यासाठी गोव्यातील खाद्यपदार्थ आणि इतर उत्पादने खरेदी करण्यासाठी देशभरातील नागरिकांना www.swayampurnagoa.com या वेबसाईटवर जावे लागणार आहे. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर वैयक्तिकरीत्या पहिली ऑर्डर नोंदवत ३४५ रुपयांना एक याप्रमाणे १,७२५ रुपयांच्या पाच चकल्यांच्या पाकिटची ऑर्डर नोंदवली आहे.

सरकारच्या ई-बाजारचा राज्यातील नोंदणीकृत बचतगटांच्या सुमारे ४६ हजार महिला सदस्य तसेच हस्तकला, वस्त्र तसेच इतर विभागांमधील सुमारे १२ हजार कारागिरांना फायदा होणार आहे. ई-बाजारमुळे स्वयंपूर्ण गोवा मोहिमेला आणखी बळकटी मिळणे शक्य होणार असल्याचे नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याचे संचालक विजय बी. सक्सेना यांनी नमूद केले.

दरम्यान, देशभरातील ग्राहकांना गोव्याती​ल खाद्यपदार्थ किंवा उत्पादने खरेदी करण्यासाठी www.swayampurnagoa.com या वेबसाईटद्वारे ऑर्डर द्यावी लागेल. त्यानंतर त्याला ती त्याच्या भागातील सरकारने निश्चित केलेल्या केंद्रावर मिळेल. संबंधित केंद्रांतील कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित वस्तू किंवा उत्पादन ग्राहकांना घरपोच मिळण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असेही सक्सेना यांनी सांगितले.