मिळून साऱ्याजणी महिला मंचाकडून २० वर्षे महिला दिन साजरा करण्याचा विक्रम

वैभव नाईक यांचे गौरवोद्गार
Edited by:
Published on: March 09, 2025 12:07 PM
views 196  views

कणकवली : मिळून साऱ्याजणी महिला मंच कणकवलीच्या वतीने आज मातोश्री हॉल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महिलांचे विविध कार्यक्रम घेण्यात आले. महिलांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहुन सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला होता.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, माजी नगरसेविका समृद्धी पारकर,मिळून साऱ्याजणी महिला मंचच्या अध्यक्ष नीलम सावंत पालव व सर्व पदाधिकारी व सदस्य महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी मा. आम. वैभव नाईक म्हणाले, गेले २०  वर्षे मिळून साऱ्याजणी महिला मंच नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली एकदिलाने महिला दिन साजरा करत आहे.महिला दिनाचा हा खरा विक्रम कणकवली शहरात झाला आहे. या माध्यमातून महिलांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. आज महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाही.प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. मात्र सध्या महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे.

अशावेळी सर्व महिलांनी एकत्र येऊन त्याचा तीव्र विरोध केला पाहिजे. अन्यायग्रस्त महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महागाई वाढत आहे. लाडकी बहीण योजनेतून महिलांना वगळले जात आहे. अशा चुकीच्या गोष्टींना देखील आपण विरोध केला पाहिजे असे मार्गदर्शन वैभव नाईक यांनी केले.