
कुडाळ : तेंडोली गावठाण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ८ चे छप्पर शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी रोजी कोसळले. त्यानंतर शाळेच्या उर्वरित काही भागाचे छप्पर सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी पुन्हा कोसळल्याची घटना घडली. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थांनी भर उन्हातच शाळा भरवली.
या घटनेची तात्काळ दखल आमदार निलेश राणे यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख दत्ताजी सामंत आणि उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांच्या माध्यमातून सोमवार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य शाळेजवळ दाखल करण्यात आले.
शाळेच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ पावले उचलल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, गावठाण शाळा क्रमांक ८ तसेच समस्त तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.










