आठवडा बाजारात नवा ट्वीस्ट | स्थानिक व्यापाऱ्यांची नगरपरिषदेला धडक

मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना दिलं निवेदन
Edited by: विनायक गांवस
Published on: February 27, 2023 13:17 PM
views 265  views

सावंतवाडी : संत गाडगेबाबा भाजी मार्केट, गवत मंडईतील स्थानिक दुकानदार व किरकोळ विक्रेत्यांनी आठवडा बाजार योग्य नियोजनबध्द आराखडा आखून स्थलांतरीत करावा व आठवडा बाजारा व्यतिरिक्त इतर दिवशी बाहेरील व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची भेट घेत निवेदन दिले.


या निवेदनात म्हटले आहे, आम्ही स्थानिक व्यापारी व किरकोळ व्यापारी, भाजीविक्रेते यांच्यावतीने आपणांस विनंती करतो की, सदर आठवडाबाजार तलावाकाठी भरवला जातो. परंतु त्याचा स्थानिक व्यापारीवर्गाला व जनतेला दिवसेंदिवस बाहेरील व्यापाऱ्यांमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आठवडा बाजारादिवशी बाहेरील व्यापारी, भाजीविक्रेते व स्थानिक व्यापारी यांच्यात जागेवरुन भांडणे, मारामारी यासारख्या बाबी रोज होताना दिसतात. तसेच यातील काही लोक नशेत किंवा चक्कर येणे यामुळे तलावात पडतात. अशा घटना वारंवार घडत असतात. वाहतुकीसारखे व पार्किंगसारखे गंभीर प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे आपले प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट व स्थानिक व्यापारी यांना एकत्र घेवून नियोजनबध्द आराखडा आखून आठवडा बाजार इतर ठिकाणी स्थलांतरीत करावा व प्रत्येकास शिस्त लावावी. या आठवडा बाजारानंतर बुधवार ते सोमवार स्थानिक भाजीमार्केटमध्ये कुठच्याही प्रकारचा व्यापार होत नसून बाहेरील व्यापारी आठवडा बाजारा व्यतिरिक्तसुध्दा हॉटेल मॅंगो, शिरोडा नाका, सावंतवाडी एसटी स्टैंड, इतर चौकाचौकात, सावंतवाडी सीमेलगत भाजी विक्रेते, कपडे, फेरीवाले, प्लास्टीक विक्रेते हे वाहतुकीस अडथळा करून दुकाने थाटतात व दुय्यम दर्जाचा माल विकून जनतेची फसवणूक करीत असतात. आपल्या नगरपालिकेस कुठच्याही प्रकारचा कर पावती न भरता व इतर परवाने न घेता राजरोसपणे दांडगाईने व्यापार करतात. मात्र भाजीमार्केट परिसर, विक्रेते व दुकानदार आज या परिस्थितीतमुळे कर्जबाजारीने उपासमारीची पाळी आमच्यावर आली असून आम्ही सर्व दरदिवशी करपावती व इतर परवाने व प्रशासनाचे सर्व अटी नियम पाळून व्यवसाय करत असताना आमच्यावर पूर्णपणे अन्याय होत आहे.


स्थानिक व्यापारी हा सावंतवाडी शहराच्या प्रत्येक सुखदुःखात व विकासात्मक कामात आर्थिक बाबतीत त्याचा वेळोवेळी सहभाग असतो. परंतु बाहेरून येणारे व्यापारी यांचा ना सावंतवाडीला फायदा किया इतर गोष्टीत सहभाग नसून सावंतवाडीची शांतता मात्र मारामान्या, भांडणे करुन सावंतवाडी शहराला (काळीमा फासत आहेत. यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांचा इतर दिवशी आजूबाजूला बसून जो व्यापार करतात त्यांचा त्वरीत व ताबडतोब कडक कारवाई करून त्यांना बंद करावे. अन्यथा स्थानिक व्यापारी यांना इतर सनदशीर मार्गाने दाद मागून उपोषण, आंदोलन यासारख्या मार्गाने जावून निर्णय घ्यावा लागेल. त्यापेक्षा आठवडा बाजारावरून जर निर्णय होत नसेल तर आठवडा बाजार कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. व स्थानिक व्यापान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे.