कुडाळातील निवजेत मोठे चक्रीवादळ

3 कुटुंबाचे मोठे नुकसान
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: September 30, 2025 13:01 PM
views 1853  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निवजे गावात अचानक आलेल्या एका शक्तिशाली चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की, यात किमान तीन कुटुंबांचे मोठे नुकसान झाले असून, गावातील भात शेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे.

या चक्रीवादळामुळे प्रसाद पांडुरंग नामनाईक, संदीप दशरथ नामनाईक, कृष्णा रामचंद्र नाईक, आणि प्रदीप गंगाराम राऊळ या ग्रामस्थांच्या घरांचे व वाड्यांचे पत्रे उडून गेले, ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळ वेगाने पुढे सरकल्याने या भागातील शेतीचेही अपरिमित नुकसान झाले असून, उभी भातशेती पूर्णपणे आडवी झाली आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचा पंचनामा करून बाधितांना योग्य ती मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अचानक आलेल्या या वादळामुळे निवजे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.