
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील तळकट गावात काल रात्री सुमारे ११:२० वाजण्याच्या सुमारास बिबट्याने थेट लोकवस्तीमध्ये प्रवेश करत दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात हजेरी लावली. या घटनेचा थरारक प्रसंग घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.
या अनपेक्षित घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या काही काळ अंगणात उभा असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर तो परिसरातून निघून गेला. मात्र, लोकवस्तीमध्ये वन्यप्राण्याचा हा मुक्त संचार ग्रामस्थांसाठी नव्या संकटाचे संकेत ठरत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांचे ओरडणे व पावलांचे आवाज ऐकू येत होते. मात्र, काल रात्रीचा हा प्रसंग प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्याने भीती अधिक वाढली आहे. दररोज सकाळी मुले शाळेसाठी बाहेर पडतात. तर येथे फळबागायती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना पहाटेपासून शेतीकामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर सुरू राहिला, तर कोणतीही अनर्थाची शक्यता नाकारता येणार नाही. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न जाणे, घरांच्या अंगणात प्रकाश ठेवणे आणि पाळीव जनावरे सुरक्षित स्थळी बांधून ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.










