फौजीचा संघर्ष आणि शौर्याचा प्रवास...!

Edited by:
Published on: May 13, 2025 15:25 PM
views 95  views

" शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती"  गीत आणि भारत माता की जय...ही घोषणा ऐकली  की अंगात दहा हत्तींचे बळ येते. देशाच्या सीमेवर लढण्याचे स्वप्न म्हणजेच खरी देशभक्ती असून अशी देश सेवा करण्याचे भाग्य मिळणे म्हणजेच आपल्या जीवनाचे सार्थ होणे आहे. हीच प्रेरणा घेत सुभेदार प्रवीण तांबडे यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला.

एका शेतकरी आणि सैनिकाच्या कुटुंबात गाव ताम्हाणमळा येथे सुभेदार प्रवीण आत्माराम तांबडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, आत्माराम देवाजी तांबडे हे भारतीय लष्करात कार्यरत होते. त्यांनी १८ वर्षे सेवा केली. त्यांनी अत्यंत साधेपणाने, पण देशप्रेम आणि शिस्तीने जीवन व्यतीत करीत आहेत. घरात कधीच खूप काही नव्हतं, पण मूल्यं आणि संस्कार नेहमीच समृद्ध होते. त्यांचे बालपण मातीच्या रस्त्यांवर गेले. वडिलांना शेतात मदत करत, आणि रात्री रॉकेल दिव्यावर अभ्यास करत. पण लहानपणापासून एक गोष्ट मनात घर करून बसली होती जेव्हा कधी कुठे फौजी पाहिला, त्याची छातीवरची शान, डोळ्यातली चमक आणि चालण्यातला अभिमान... मला वाटायचं, "कधीतरी मीही असाच वर्दीत असेन. त्यांच्या याच दुर्दम्य ध्येयनिष्ठेचा व देशाप्रती सर्मपणवृत्तीचा आढावा.

भारतीय सैनिक म्हणजे एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा स्रोत आहे. देशाच्या सीमेवर जनतेच्या संरक्षणासाठी लढणे या सारखे भाग्य नाही. सुभेदार प्रवीण तांबडे सांगतात, माझ्या मोठा भाऊ ३० वर्षांपासून भारतीय लष्करात सेवा कार्यरत आहे आणि वडिलांचं आणि भावाचे जीवन पाहूनच मी शिकलो की शौर्य म्हणजे फक्त युद्ध नाही, तर प्रत्येक दिवस आपल्या कुटुंबापासून दूर राहून, देशासाठी समर्पण असते.

आपण शिकताना, वडिलांचे कष्टाचं आयुष्य आणि भावाचं शौर्य नेहमी आपल्यासमोर असल्याचे सुभेदार प्रवीण तांबडे सांगतात. गावात दहावीपर्यंतचं शिक्षण घेतल्यानंतर, रामपूर येथे मिलिंद हायस्कूल अँड जुनिअर कॉलेज कॉमर्स अँड आर्टस् येथे अकरावी-बारावी शिक्षण पूर्ण करून चिपळूण कॉलेजमध्ये आर्मी बॉईज हॉस्टेलला राहून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिकतानाच माझ्या खऱ्या शिक्षणाची सुरुवात झाली. पेपर टाकणं, दूध वाटप करणं, आणि अरुता कॉम्प्युटर, चिपळूण येथे शिकवणं, हेच माझं खरं शिक्षण होतं, कारण यातूनच मला जीवनाच्या खऱ्या मूल्यांचा आणि मेहनतीचे महत्त्व कळले.

दहावी संपल्यावर अनेक जण वेगवेगळ्या वाटांवर गेले, पण मी निवडली एक वेगळी वाट शिस्त, त्याग आणि देशप्रेमाची, भारतीय लष्करात भरती झालो. जेव्हा निवड झाली. तेव्हा आई-बाबांचे डोळे भरून आले. आईने माझ्या डोक्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हटलं, 'ह्याचं रक्षण आता देश करेल, माझ्या सैन्य जीवनातील प्रारंभिक दिवस खूप रोमांचक आणि शिक्षणकारक होते. प्रशिक्षण हे अत्यंत कठीण होतं. कधी शरीर साथ देईना, कधी मन थकून जाई. पण प्रत्येक थेंब घामाचा, प्रत्येक दुखापत... माझ्यासाठी सन्मानाचं चिन्ह होती. मी फक्त सैनिक नव्हतो बनत मी एक मजबूत आत्मा घडवत होतो, जो देशासाठी काहीही करू शकेल, वर्ष सरत गेली. मी वाळवंटात उभा राहिलो, हिमालयात बर्फात पहारा दिला, सीमेवर डोळा न झपकता रात्री घालवल्या. अनेक सण घरी नसतानाही साजरे केले पण मनात कधीही खंत नव्हती, कारण जेव्हा देश हाक देतो, तेव्हा फौजी हजर म्हणतो, माझे अनेक सहकारी हसत-खेळत लढाईवर गेले आणि तिरंग्यात  गुंडाळून परत आले, त्यांच्या बलिदानाने मन हेलावलं, पण त्यांच्यासाठी मी आणखी मजबूत झालो. मी मनाशी एक वचन दिलं "आपण फक्त स्वतःसाठी नाही, तर अशा शूर वीरांसाठीही जगायचं."

हिमनगाच्या फौजी जीवनातील अनुभव

लष्करात भरती झाल्यानंतर आमचं पहिले पोस्टिंग-४० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या गुरेज सेक्टरमध्ये झालं. बर्फाच्छादित पर्वत, श्वास घेणंही कठीण अशा थंड हवामानात आम्ही देशाच्या सीमेवर पहारा देत होतो. त्या परिस्थितीत फक्त शरीरच नाही, तर मन देखील बर्फासारखं मजबूत आणि ठोस असावं लागतं. रात्री अंधारात, बर्फात चालणं, उभं राहणं, आणि शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवणं हे आमचं दैनंदिन जीवन होतं. शरीर गोठत होतं, पण देशासाठी धगधगतं मन आम्हाला उष्णतेसारखं ऊर्जा देत होतं. त्या पहिल्या काही वर्षांतच, आम्ही जीवन, मृत्यू, दोस्ती आणि देशसेवा यांचा खरा अर्थ समजून घेतला. अनेकदा आमच्या शेजारील साथीदार शहिद झाले, आम्ही अश्रू पुसले नाहीत, कारण आमची शपथ होती रहायचं नाही, लढायचं.

गुप्तचर विभागात कार्यरत

सैन्यात इंजिनिअर विभागात होतो पण मन नेहमी म्हणायचं "हे दिल मागे मोअर!" म्हणून मी एक मोठा निर्णय घेतला सुरु असलेले काम सोडून मी सैन्य खुफिया विभाग आर्मी इंटेलिजन्स कॉप्समध्ये प्रवेश केला. आता काम होतं गुप्त माहिती गोळा करण, संशयित ओळखणं, गुप्तहेर सोडणे, गुप्तहेर ना ट्रेनिग देणे आणि देशाला पुढे येणाऱ्या धोक्यापासून सावध करणे. हे काम करता करता पण मन अजूनही म्हणायचं "हे दिल मागे मोअर !"

भारतीय लष्करातील चीनी भाषांतरकार

आपण वेगळं काय करू शकतो? असा प्रश्न स्वःलाच विचारला. जगातील सर्वात कठीण भाषांपैकी एक चिनी (चायनीज) भाषा शिकण्याचा निर्धार केल्याचे सुभेदार तांबडे सांगतात. दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला आणि भारतीय सैन्यात चीनी भाषांतरकार म्हणून नवा प्रवास सुरू झाला. एक काळ होता, जेव्हा हातात बंदूक होती. आता हातात हेडफोन होता आणि कान सतत शत्रूच्या आवाजावर । " चायनीज भाषेचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय लष्करात चायनीज ट्रानसलेटर म्हणून नवा विभाग मिळाला. ऑफिसमध्ये बसून कानात हेडफोन लावून चीनच्या कॉल इंटरसेप्शनवर लक्ष ठेवण्याचे हे महत्त्वाचे काम होते. होतो. शब्द 'शत्रूचा', पण जबाबदारी होती 'राष्ट्राची' या नव्या जबाबदारीबरोबरच पदोन्नती मिळाली "प्रविण तांबडे"च्या नावापुढे हवालदार ऐवजी नायब सुभेदार अशी नवी ओळख लागली.


दिल्ली पोस्टिंगच्या वेळी सुट्टीच्या दिवशी आर्थिक प्रोफेशनल क्लासेस अटेंड करू लागलो. यामध्ये पारंगत झालो, आज देशभरातील दहा ते बारा हजार ग्राहकांचे कर सल्लागार बनलो. देशसेवा फक्त बंदुकीने होत नाही ती आता पेन, ज्ञान आणि मार्गदर्शनाने सुद्धा करता येते!" त्या वर्षांनी आम्हाला शिस्त, सहनशीलता, नेतृत्व, आणि माणूस म्हणून घडवण्याचं काम केलं. आम्ही फक्त एक शिपाई नव्हतो, आम्ही देशाच्या रक्षणासाठी उभे असलेले एक अदृश्य भिंत होतो. आणि आता २४ वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेले सुभेदार तांबडे म्हणतात, शेवटची वर्दी घालताना, डोळे भरून आले. पण ओठांवर हसू होतं कारण शून्यातून सुरुवात केली, आणि आज मी एक "फौजी" म्हणून ओळखला जातो. एका सैनिकाचं खरं यश हे फक्त युद्ध जिंकल्यानं नव्हे, तर दुसऱ्याच्या आयुष्यात नवी दिशा देण्यात असते.' आज निवृत्त सैनिक आहे, पण मनाने, शिस्तीने, विचाराने... मी कायम फौजीच राहीन. आता मी पुन्हा सामान्य माणसांसोबत जीवन जगणार आहे, पण माझं आयुष्य देशसेवेने पवित्र झालंय.

माझ्यासाठी प्रत्येक दिवस, महिने, वर्ष... सण, आनंद, कठीण प्रसंग अशा साऱ्यात ती निर्धारानं उभी ठाकली. दिवाळी वा मुलांचा वाढदिवस त त्यांची आजारपणं ती न थकता प्रसंगाला सामोरी गेली. तिला माहिती होतं 'माझा नवरा सीमेवर आहे. मी जर थकले, तर त्याचं मन धकेल.' ती कुठल्याही सन्मानांच्या यादीत नव्हती. तिच्यासाठी ना मेडल होते, ना गार्ड ऑफ ऑनर, पण आज मी जिथे आहे, त्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या सोसलेल्या कष्टांचा नि ओघळलेल्या अश्रूचा हात आहे.