नगरसेविका बनणार पत्रकार | नगरपंचायतीत पत्रकारांना निमंत्रित करत नसल्याने निर्णय

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 21, 2023 20:29 PM
views 144  views

वैभववाडी : नगरपंचायतीच्या सभांना माध्यम प्रतिनिधींना निमंत्रित केले जात नसल्याने आता वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या नगरसेविका अक्षता जैतापकर पत्रकारांची भुमिका बजावणार आहेत.नगरपंचायतीच्या सभांचे चित्रीकरण करणार आहेत.याबाबतचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

वाभवे -वैभववाडी नगरपंचायतीच्या सभांना माध्यम प्रतिनिधींना निमंत्रित केले जात नाही.याबाबत  सौ.जैतापकर ह्या गेले वर्षभर संघर्ष करीत आहेत.याकरिता त्यांनी उपोषण देखील केले होते.मात्र तरी देखील पत्रकारांना निमंत्रित केले जात नसल्याने आता त्यांनी थेट स्वतः पत्रकारांची भुमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे.गुरवार दि २२जून रोजी होणाऱ्या मासिक सभेच चित्रीकरण करणार आहेत.याबाबत त्यांनी लेखी जिल्हाधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना कळविले आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत सभांना माध्यमे उपस्थित नसल्याने याठिकाणी नेमके काय होतं आहे हे जनतेला समजत नाही.जनतेच्या अर्जांना उत्तरे दिली जात नाही,माहीती अधिकारात मागवलेली माहिती मिळत नाही,सभेत मंजूर नसलेली कामे मंजूर होतात, विरोधकांनी मांडलेल्या सुचना प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही असे अनेक प्रकार होत आहेत.हे सर्व प्रकार जनतेसमोर जावेत याकरिता गुरुवारच्या सभेचं चित्रीकरण करणार आहे असं जैतापकर यांनी म्हटले आहे.नगरपंचायत प्रशासन त्यांना चित्रीकरण करायला देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे