'वाघखेळ' पाहण्यासाठी हेवाळेत भाविकांची अलोट गर्दी !

पाच दिवसांच्या शिमगोत्सवाची उत्साहात सांगता
Edited by: संदीप देसाई
Published on: March 28, 2024 14:09 PM
views 255  views

दोडामार्ग : पारंपरिक लोककला व संस्कृती हे वैशिष्ट्य जोपासत तळकोकणात हेवाळे गावात अनोखा वाघखेळ गुरूवारी भाविकांच्या अलोट गर्दीत उत्साहात संपन्न झाला. कोकणचा शिमगोत्सव अनेक रूढी, परंपरा व लोककलानी साजरा होत असतो. असाच शिगमोत्सवातील 'वाघखेळ ' चां अनोखा नजराणा हेवाळे गावी भाविकांना याची देही याची डोळा पाहवयास मिळाला.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका टोकाला असलेला दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे गाव. आजही हा गाव आपल्या धार्मिक परंपरांना तितक्याच ताकदीने पुढे नेत आहे. कारण या धार्मिक परंपरा म्हणजे खेड्यांचा विशेषत: गावांचा आत्मा असतो. अगदी तसाच हेवाळेचा शिगमोत्सवही एका वेगळ्या धाटणीचा आहे. आपल्या अध्यात्म शक्तीने या गावची ग्रामदेवता श्री देव ‘मायगांवस’ हा गावात एकाच तळीवर ‘वाघ’ आणि ‘शेळी’ यांना पाणी पाजायचा. मात्र कधीही वाघानं शेळीकडे वक्रदृष्टीनं पाहिलं नाही. एकोप्यानं ते राहायचे.  वाघ खेळ!’ म्हणजे शत्रूला सुद्धा प्रेमाच्या धाग्यात गुंफल्यावर तो मित्र बनतो, याचा आदर्श या गावाकडून घ्यावासा वाटतो.  ‘मायगांवस’ ने हे सर्व केलं, आणि तीच आता या गावची ग्रामदेवता बनली.  या गावाची अशी अख्यायिका सांगितली जाते. आणि हाच एकोप्याचा उत्सव अर्थात शिमगोत्सव गेली वर्षनुवर्षे हेवाळेत साजरा होतोय. यावर्षी सुद्धा हा उत्सव पाच दिवसांचा मोठ्या दिमाखात सपन्न झाला. गुरवारी या उत्सवाची घोडेमोडणी, वाघखेळ, पालखी व न्हावण कार्यक्रमाने सांगता झाली.

 सायंकाळी ५.३० ला शिगमोत्सवात घोडेमोडणी व त्यानंतर होणारा वाघ खेळ पाहणे हा ग्रामस्थ आणि भाविकांसाठी एक औत्सुक्याचा विषय. होळीच्या आवारात यावर्षी सुद्धा हा उत्सव रंगला. भाविकांनी आणि गावकर्‍यांनी याच वाघाकडून आपल्या माथ्यावर धुळवड मारून घेत पुढील वर्षभराची रखवाली  घेतली. ‘मायगवस’ची कृपा आणि मायेचा स्पर्श यानिमित्ताने या उत्सवात सहभागी भाविकांना घेता आला.  रात्री पालखीची ओटी भरण्यासाठी सुद्धा गावातील महिला, माहेरवाशिणी मुली यांनी मोठी गर्दी केली होती. देवराईत मुख्य ग्रामदेवतांच्या मंदिरात पालखी नेत न्हावणाचा कार्यक्रम उशिरा पर्यंत संपन्न झाला. एकूणच हेवाळे गावची ही परंपरा आणि उत्सव येथे येणार्‍या भाविकांना औत्सुक्याचा विषय बनत आहे. त्याचमुळे भाविकांची सुद्धा उपस्थिती वाढतीच आहे .

काय असतो वाघखेळ ?

      तुम्ही म्हणाल, हा वाघ खेळ म्हणजे काय? तर गावातीलच एक व्यक्ती, वाघ बनून येतो. घोडेमोडणी संपल्यानंतर मंदिराच्या आवारात हा वाघ दाखल होतो. देवदेवतांचा आशीर्वाद घेऊन खेळाला सुरूवात होते. मंदिराच्या आवारात विविध खेळ खेळले जातात. आणि या खेळातूनच गावातील भाविक वर्षभराची त्याच्यापाशी रखवाली मागतात. तोच रक्षणकर्ता, तारणहार आणि आराध्य आहे, ही लोकांची श्रद्धा या निमित्ताने अधिक ठळक होते. याठिकाणी आलेली प्रत्येक व्यक्ती या वाघाकडून अर्थात वाघरूपी त्या मानवाकडून आपल्या डोक्यावर धुळवड घेवून देवाचा आशीर्वाद घेते. त्यानंतर धार्मिक विधी होतात. गेली कित्येक पिढ्या हा खेळ हेवाळेवासीय मोठ्या श्रध्देने पुढे नेत आहेत हे विशेष.