
कणकवली : शिरंगे पुनर्वसन खानयाळे बोडण येथील तिलारी प्रकल्पग्रस्त असलेल्या अभिजित नारायण घाडी या युवकाच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. त्यात त्याचे घर व संसार आणि लग्नासाठी केलेले दीड लाखाचे दागिनेही जळून खाक झाले. सुमारे अभिजित घाडी याचे 15 लाखाचे नुकसान झाल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत सार्वजनिक बांधकाम कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तात्काळ घाडी कुटंबियांच्या खात्यावर 10 हजारचा धनादेश जमा केला.
शिरंगे पुनर्वसन खानयाळे बोडण याठीकाणी आता वास्तव्यास असलेल्या अभिजितच्या वडिलांनी तिलारी प्रकल्पाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईतून घर बांधले होते. या घरात अभिजित, त्याची बहीण आणि आई वडील असं चार जणांचं कुटुंब राहत होत. पण कालांतराने अभिजितचे आई आणि वडील यांच निधन झाले. बहिणीचं लग्न झाल्याने अभिजित हा आता एकटाच घरी राहत होता. सध्या गोव्यामध्ये एका हॉटेल मध्ये नोकरी करत आहे. 18 डिसेंबर 2023 ला शॉर्ट - सर्किट मुळे त्याच्या घराला आग लागून सार काही होत्याच नव्हतं झालं. घराला लागलेली आग नातेवाईक आणि ग्रामस्थानी आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र आगीने एकदम भडका घेतल्याने या भीषण आगीत अभिजिताचे घर जळून खाक झाले. नव्हेत तर घरातील कपडे, भांडी, कपाट, विद्युत उपकरणे, लग्नासाठी तयार केलेलं सोन्याचे दागिने यासह घराचे छप्पर , वासे, रीप,मंगलोरी कौले असे एकूण लाखोंचं नुकसान झाले आहे. त्यामुळे अभिजित वर डोंगराएवढ संकट कोसळलं आहे. हॉटेल मध्ये नोकरी करून हे सारं सावरायचं कसं अशा विवंचनेत सध्या अभिजित सापडला आहे.
मात्र हे वृत्त पाहताच संवेदनशील मनाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी स्वत:च्या खिशातुन सढळ हस्ते अभिजित घाडी याच्या खात्यावर 10 हजार रुपयाची मदत 6 जानेवारीला केली आहे. त्याबद्दल श्री. सर्वगोड यांचे सर्वच स्तरातुन कौतुक केले जात आहे.