हॅट्रिक पराजयाची | कणकवलीत झळकले बॅनर !

शेतकरी खरेदी विक्री संघातील पराभवानंतर शिवसेनेला डिवचले
Edited by: उमेश बुचडे
Published on: January 09, 2023 11:43 AM
views 641  views

कणकवली : निवडणूक कोणतीही असो,  प्रतिक्रिया उमटणे हा कणकवलीचा स्थायीभाव बनला आहे. त्याची प्रचिती कणकवली शेतकरी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत आली आणि या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा शेतकरी खरेदी विक्री संघात झालेल्या पराभवानंतर “ठाकरे शिवसेनेच्या पराभवाची हॅट्रिक”असे बॅनर काही ठिकाणी झळकले असल्याने कणकवलीत वेगळीच चर्चा ऐकायला मिळाली.

कणकवली शेतकरी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजपा प्रणित पॅनलने 14 जागा तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने 1 जागा मिळवली. शिवसेना प्रणित पॅनलला या निवडणुकीत खाते खोलता आले नाही त्याची प्रचिती बॅनरच्या माध्यमातून भाजपाने साधली आहे.


आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेल्या एकतर्फी विजयानंतर कणकवलीत हे बॅनर लक्ष वेधून घेत होते. विधानसभेत शिवसेनेचा पराभव आम.नितेश राणे यांनी केला होता त्यांनतर ठाकरे शिवसेनेचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाला होता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आघाडीचे अध्यक्षांसह शिवसेनेचे बडे नेते पराभूत झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका गेल्या दोन महिन्यापूर्वी लागल्या त्याचा निकाल पाहता कणकवली मतदारसंघासह तालुक्यात ठाकरे शिवसेनेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. 

त्यानंतर शेतकरी खरेदी विक्री संघाची तिसरी निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेना नेत्यांची या शेतकरी खरेदी विक्री संघात प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गोट्या सावंत, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी खरेदी विक्री संघातील १५ ही जागा भारतीय जनता पार्टीने एकतर्फी विजय मिळवून निवडून आणल्या त्यामुळेच सततचा तिसरा पराभव ठाकरे शिवसेनेचा झाला आहे. याची आठवण करून देण्यासाठी भाजपकडून नगरसेवक संजय कामतेकर यांनी बॅनर लावून पराभवाची हॅट्रिक शिवसेनेने केली याची आठवण करून दिली आहे.

 या बॅनरवर परमपूज्य भालचंद्र बाबांच्या भूमीत सत्याचाच कायम विजय होतो, असे लिहून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.त्यामुळे या बॅनरची चर्चा सुरू होती.