
मंडणगड : गुरे चरविण्यासाठी घेवून जात असलेल्या एका शेतकऱ्यावर इको गाडीतून येवून पाच ते सात जणांच्या टोळक्याने त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकूने पाठीत वार करीत त्याच्या गळ्यातील सुमारे सात तोळ्याची सोन्याची चेन हिसकावत व दहा लाखांची मागणी करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची फिर्याद संतोष बाबू कुटेकर रा. शेनाळे ता. मंडणगड जि. रत्नागिरी यांनी मंडणगड पोलिसात दाखल केली आहे. तर श्री. संतोष कुटेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला होवून तब्बल सात दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना मंडणगड पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे मंडणगड पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून या आरोपींना बड्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा मंडणगड तालुक्यात सुरु झाली आहे. श्री. कुटेकर यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे मंडणगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत फिर्यादीकडून मिळालेली माहिती अशी तालुक्यातील मौजे शेनाळे येथील शेतकरी श्री. संतोष बाबू कुटेकर वय ४४ वर्षे हे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आपली गुरे चारविण्यासाठी घेवून जात असताना सकाळी ०७.४५ वाजता शेनाळे घाटातील उमा बाग येथे आले असता म्हाप्रळ कडून मंडणगड कडे जाणाऱ्या एका इको गाडीतून चार जण अचानक उतरले व सर्वांनी कुटेकर यांना अचानक घेरले. त्यापैकी एकाने गुप्ती काढली, व एकाने टॉमी काढली, त्याचवेळी मौजे वाकवली येथील नथुराम शिनगारे याने कुटेकर यांना पकडले व एकाने कुटेकर यांच्या पाठीत चाकूचे वार केले तर दुसऱ्याने कुटेकर यांच्या पायावर गुडघ्याखाली टॉमी ने मारले.यापैकी एकाने संतोष कुटेकर यांच्या गळ्यातील सात तोळ्याची सोन्याची चेन खेचून काढून घेतली.व कुटेकर यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.त्याचवेळी कुटेकर हे आपला जीव वाचविण्यासाठी जंगलात पळून गेले .केवळ दैव बलवत्तर म्हणून संतोष कुटेकर यांचा जीव वाचला .जबर जखमी झालेले संतोष कुटेकर यांच्यावर मंडणगड येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद संतोष कुटेकर यांनी २३ फेब्रुवाी २०२५ रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत नथुराम शिनगारे, प्रकाश शिनगारे,सदानंद जवूळ ,सचिन शिनगारे,संतोष अबगुल, रविराज शिनगारे, दीपक पेंढारे, अनंत महाडिक, स्वप्नील जवूळ, यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(२ ),३०८ (२ ) , १०९ ( १ ) ,११८ (१ ) अन्वये मंडणगड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे हे करीत आहेत.
या गंभीर प्रकरणात गुन्हा दाखल होवून तब्बल सात दिवसानंतरही आरोपींना पोलिसांकडून अटक नाही. आरोपी मोकाट आहेत. याबाबतचा गुन्हा २३ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींवर गुन्हा दाखल होवूनही तब्बल सात दिवस उलटूनही आरोपींना पोलिसांनी अटक केलेली नाही. त्यामुळे आरोपी अजूनही मोकाट आहेत. आरोपींवर सत्तेतील बड्या राजकीय नेत्याचा हात असल्यामुळे आरोपी अजूनही मोकाट असल्याची जोरदार चर्चा मंडणगड तालुक्यात सुरु आहे.