शिवसंस्कार चा भव्य सन्मान सोहळा

Edited by:
Published on: October 16, 2024 13:30 PM
views 463  views

सावंतवाडी : मातृभूमी शिक्षण संस्थेच्या शिवसंस्कार उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक,गुजरात या चारही राज्यात वर्षभर घेतल्या गेलेल्या ऑनलाइन विविध ऐतिहासिक स्पर्धांचा दुसरा भव्य वार्षिक सन्मान सोहळा सावंतवाडीमध्ये दि १३ ऑक्टोबर २०२४ ला बॅ  नाथ पै सभागृहात मोठ्या दिमाखात सपन्न झाला. गतवर्षी पहिला सन्मान सोहळा गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा प्रमोद सावंत यांच्या हस्ते रवींद्र भवन ,साखळी येथे पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांचे विचार ,कार्य मुलांच्या मनात रुजवून शिवविचारांची पिढी निर्माण करणे हा शिवसंस्कार चा हेतू आहे. विचार रुजले तरच त्यांचं आचरण होऊ शकतं ज्यामुळे आयुष्यात धैर्य, अचूक नियोजन, प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करणं यांसारखे गुण आत्मसात करून  पुढील पिढ्याना हा वारसा आपण देऊ शकतो. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत हे विचार रुजणे ही काळाची गरज आहे.

या सन्मान सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,भाजपा युवा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा विशाल परब  सावंतवाडी संस्थान चे युवराज मा लखमराजे भोसले उपस्थित होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी  महाराज यांच्या भूमिका साकारणारे सिने अभिनेते मा गश्मीर महाजनी यांची विशेष उपस्थिती सोहळ्याला लाभली . देऊळ बंद या चित्रपतील त्यांची भूमिका आणि चित्रपट यांच्यावर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले. तसेच , आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित' फुलवंती' चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका सकारली असून चित्रपट ११ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

कार्यक्रमात सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.जिल्हास्तरीय श्री शिवचरित्र स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व स्पर्धकांना, उत्तेजनार्थ यश मिळवलेल्या तसेच या परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

ऐतिहासिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल चिपळूण येथील श्री प्रकाश देशपांडे यांना छ.शिवाजीमहाराज ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पुरस्कार ,श्री सचिन मदगे गोवा यांना छत्रपती शिवाजी महाराज इतिहास संशोधक पुरस्कार तर श्री सौरभ कर्डे,पुणे याना छत्रपती संभाजी राजे युवा इतिहास अभ्यासक पुरस्कार  असे  शिवसंस्कार चे मानाचे विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता विद्यालय तळवडे मधील मुख्यध्यपक श्री प्रतापराव देसाई, मदर क्विन्स इंग्लिश स्कुल,सावंतवाडीच्या सौ श्रुती जोशी व मळगाव येथील श्री उमाजी राणे यांचा शिवचरित्र स्पर्धा परीक्षेतील उत्कृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमानंतर सिंधुदुर्गातील नामांकित शिवगणेश प्रोडक्शन्स सिंधुदुर्ग मुंबई या संस्थेचा'इथे ओशाळला मृत्यू'हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील  औरंगजेबाशी झालेल्या संघर्षावरील धगधगता इतिहास मांडणार नाट्य खास आग्रहास्तव होणार आहे.सदर नाट्यकलाकृतीला पुणे, कोल्हापूर, कराड येथे रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.छ संभाजी महाराजांच्या श्री क्षेत्र वढू येथील समाधीसमोर पुण्यदिनी सादर करण्याचे भाग्य प्रयोगाला लाभले आहे.तसेच,संपूर्ण नाट्यसृष्टीत प्रयोगालाच वन्समोअर मिळवून इतिहास घडवलेलं हे नाट्य रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.या नाटकाचा हा साठवा प्रयोग असून शुभारंभा चा पहिला प्रयोगही याच नाट्यगृहात हाऊस फुल झाला होता. सावंतवाडीत तब्बल सात वेळा हा प्रयोग होऊनही प्रयोगाच आकर्षण तेवढंच आहे. मातृभूमी संस्थेच्या अध्यक्ष डॉ सोनल लेले, शिवसंस्कार चे कार्याध्यक्ष श्री गणेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सन्मान सोहळ्याची माहिती दिली. यावेळी शिवसंस्कार चे गोवा विभाग प्रमुख श्री मंदार गावडे व श्री नितिन नाईक, सावंतवाडी विभाग प्रमुख श्री अभिजित राऊळ व श्री कृष्णा करमळकर ,सदस्य प्रज्ञा मातोंडकर,प्रिता राऊळ, उर्मिला राणे,केतकी म्हापसेकर, प्रतिभा गवळी उपस्थित होते.