अ. गो. क्षत्रिय मराठा समाज निवडणूकीत सुहास फळदेसाई पॅनल विजयी

Edited by:
Published on: December 11, 2023 15:59 PM
views 47  views

पणजी : गोवा राज्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज (९६ कुळी मराठा) च्या २०२३ ते २०२६ या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी रविवारी झालेल्या निवडणूकीत सुहास  फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा एकतर्फी विजय झाला. समाज संघटनेच्या निवडणूकीत पहिल्यांदाच विक्रमी १२१८ मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 

या समाजाचे अध्यक्ष महेश नाईक गांवकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विरोधात सुहास फळदेसाई यांचे पॅनल अशी थेट दुरंगी लढत या निवडणूकीत झाली. १२ तालुक्यांसाठी तालुकानिहाय १२ केंद्रीय सदस्यपदांसाठी हे मतदान घेण्यात आले. एकूण २४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर मतमोजणीला सुरूवात झाली. रात्री ११ वाजता मतमोजणी पूर्ण होऊन निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निकालात सुहास फळदेसाई यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय झाल्याचे स्पष्ट झाले. 

तालुकानिहाय निकालानुसार बार्देश- जगन्नाथ देसाई (३४०), लक्ष्मण परब (७९९), डिचोली- शंकर महाले(८६१), सुदेश राऊत(२८९), काणकोण- दीप्तेश देसाई(८४१), महेश नाईक गांवकर(२८६), धारबांदोडा- अनिल सावंत देसाई(७७२), प्रदीप देसाई(३५२), मुरगांव- प्रेमानंद गांवस(८०९), गुरूदास शेटगांवकर(३११), पेडणे- एड.अमित सावंत(९३७), एड.अर्जून शेटगांवकर(२०६), फोंडा- महादेव प्रभूदेसाई(२३९), संजय देसाई(८३८), केपे- संजय नाईक देसाई(२८०), सुहास फळदेसाई(८०७), सासष्टी- मिलिंद देसाई(२६९), विजयकुमार कोप्रे देसाई(८६१), सांगे- बाबुराव देसाई(२६३), इच्छीत फळदेसाई(८७१), सत्तरी- दुलबाराव देसाई(८८०), म्हाळू गांवस(२४८), तिसवाडी- डॉ. मनोज प्रभूदेसाई(८९३), रामा परब(२५४) अशी मते नोंद झाली. प्रत्येक मतदाराला १२ सदस्यांसाठी मतदान करण्याचा अधिकार होता. याअंतर्गत महेश गांवकर पॅनलला ३३३७ तर सुहास फळदेसाई पॅनलला १०,१६९ मते प्राप्त झाली. 

अॅड. अमित सावंत यांना विक्रमी मतदान 

पेडणे तालुक्यातून सुहास फळदेसाई यांच्या पॅनलमधून निवडणूकीत उतरलेले मांद्रेचे सरपंच एड. अमित सावंत यांना विक्रमी ९३७ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी महेश गांवकर पॅनलचे एड. अर्जून शेटगांवकर यांना २०६ मते मिळाली. 

सुभाष फळदेसाई यांच्याकडून अभिनंदन 

निवडणूक निकालानंतर सांगेचे आमदार तथा समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी खास उपस्थित राहून विजयी पॅनलचे अभिनंदन केले. निवडणूक ही केंद्रीय समिती निवडून आणण्यासाठीची एक लोकशाहीची प्रक्रिया आहे. निवडणूकीनंतर सर्व मतभेद आणि राजकारण बाजूला सारून सर्वांनी समाजासाठी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आणि सर्वांच्या सहमतीतूनच समाजाचे काम पुढे नेण्याच्या शुभेच्छा त्यांनी विजयी पॅनलला दिल्या. सुभाष फळदेसाई यांच्यासहित नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे चेअरमन उल्हास नाईक तुयेकर, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, डिचोलीचे आमदार डॉ.चंद्रकांत शेटये, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.  तुळशीदास पंढरी देसाई, रमेश यशवंत गांवकर आणि प्रकाश केशव गांवस यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहीले.